वेस्ट इंडिजविरुद्धच्या टी-२० मालिकेत युवा खेळाडू वैभव सूर्यवंशीला संधी न दिल्याने त्याचे बालपणीचे प्रशिक्षक मनीष ओझा यांनी भारतीय संघ व्यवस्थापनावर जोरदार टीका केली आहे. गौतम गंभीरच्या नेतृत्वाखालील मॅनेजमेंटची पद्धत हुकूमशाहीसारखी असून, खेळाडूला बेंचवर बसवल्याने त्याचा आत्मविश्वास कमी होईल, असा आरोप त्यांनी केला.

पाटणा : वेस्ट इंडिजविरुद्धच्या टी-२० मालिकेतील पहिल्या तीन सामन्यांमध्ये युवा स्टार वैभव सूर्यवंशीला प्लेइंग इलेव्हनमध्ये न घेतल्याने त्याचे बालपणीचे प्रशिक्षक मनीष ओझा यांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. गौतम गंभीरच्या नेतृत्वाखालील भारतीय संघ व्यवस्थापनाचा कारभार हुकूमशाहीसारखा असल्याचा आरोप ओझा यांनी केला. वैभवसारख्या गुणवान खेळाडूंना संधी न देता बेंचवर बसवून ठेवल्याने त्यांच्या आत्मविश्वासावर वाईट परिणाम होईल, असेही ते म्हणाले.

मनीष ओझा म्हणाले की, युवा खेळाडू आंतरराष्ट्रीय स्तरावर फक्त सामने खेळूनच मोठे होऊ शकतात. "सध्याच्या भारतीय संघ व्यवस्थापनाला वाटतं की खेळाडूंना बेंचवर बसवून घडवता येतं. तुम्ही क्रिकेटमधल्या कोणत्याही दिग्गजाला विचारा, ते सांगतील की पुढच्या पिढीतील खेळाडूंना घडवण्यासाठी त्यांना सामने खेळण्याची संधी दिली पाहिजे. बेंचवर बसून कोणताही खेळाडू मोठा झालेला नाही आणि पुढेही होणार नाही," असं ओझा यांनी स्पष्ट केलं.

२०२६ च्या आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व करणारा सूर्यवंशी, वेस्ट इंडिजविरुद्धच्या मालिकेत अद्याप मैदानात उतरलेला नाही. ओझा पुढे म्हणाले की, सतत संघाबाहेर ठेवल्याने खेळाडूला संघात आपली जागा नाही, अशी निराशा येऊ शकते. "या वयात जसजसे सामने खेळायला मिळतात, तसतसा खेळाडू प्रगल्भ होतो आणि त्याचा खेळ सुधारतो. पण तो बाहेर बसून पाणी पाजतोय. मॅनेजमेंटला जे वाटतंय तेच ते करत आहेत, असं सध्या दिसतंय," असा आरोप ओझा यांनी केला.

वैभवच्या क्षमतेवर आणि भविष्यावर आपला पूर्ण विश्वास असल्याचे ओझा यांनी स्पष्ट केले. "माझ्या मते वैभव एक वादळ आहे. जे त्याला थांबवण्याचा प्रयत्न करतील ते उद्ध्वस्त होतील. हे काही सहा महिने किंवा एका वर्षासाठी नाही, तर येणाऱ्या काळात तो सूर्यासारखा चमकणारा टॅलेंट आहे," असंही ते शेवटी म्हणाले.