आयपीएल 2026 मध्ये राजस्थान रॉयल्ससाठी स्फोटक फलंदाजी करणारा युवा फलंदाज वैभव सूर्यवंशी याची भारत अ संघात निवड झाली आहे. श्रीलंकेत होणाऱ्या त्रिराष्ट्रीय एकदिवसीय मालिकेसाठी त्याची निवड झाली असून, या कामगिरीमुळे तो लवकरच वरिष्ठ भारतीय संघात स्थान मिळवू शकतो अशी चर्चा आहे.

आयपीएल 2026 स्पर्धा संपल्यानंतर राजस्थान रॉयल्सचा युवा फलंदाज वैभव सूर्यवंशी आता भारत अ संघाच्या जर्सीत दिसणार आहे. अवघ्या 15 व्या वर्षी आपल्या आक्रमक फलंदाजीने सर्वांचे लक्ष वेधून घेणाऱ्या वैभवची श्रीलंकेत होणाऱ्या त्रिराष्ट्रीय मालिकेसाठी भारत अ संघात निवड करण्यात आली आहे. त्याच्या उत्कृष्ट कामगिरीचे हे मोठे फळ मानले जात आहे.

Add Asianetnews Marathi as a Preferred SourcegooglePreferred

कोणत्या संघात वैभवला दिल स्थान? 

श्रीलंका अ, अफगाणिस्तान अ आणि भारत अ या संघांमध्ये जून महिन्यात ही एकदिवसीय त्रिराष्ट्रीय मालिका खेळवली जाणार आहे. या स्पर्धेसाठी जाहीर करण्यात आलेल्या 15 सदस्यीय संघात वैभवला स्थान देण्यात आले असून संघाचे नेतृत्व तिलक वर्मा करणार आहे. तर उपकर्णधारपदाची जबाबदारी रियान पराग याच्याकडे सोपवण्यात आली आहे.

भारतीय संघाच्या दौऱ्याकडे सर्वांचं लागलं लक्ष आयपीएल 2026 मध्ये वैभव सूर्यवंशीने आपल्या स्फोटक फलंदाजीने अनेक विक्रम मोडले. राजस्थान रॉयल्ससाठी खेळताना त्याने धडाकेबाज धावा करत क्रिकेटविश्वाचे लक्ष वेधले. प्लेऑफ सामन्यांमध्येही त्याने आक्रमक खेळी साकारत संघासाठी महत्त्वाचे योगदान दिले. त्याच्या कामगिरीमुळे राष्ट्रीय संघाच्या दारात तो पोहोचल्याची चर्चा रंगू लागली आहे. बीसीसीआय निवड समितीने वैभवला भारत अ संघात संधी देऊन त्याची आंतरराष्ट्रीय स्तरावरील तयारी तपासण्याचा निर्णय घेतल्याचे मानले जात आहे. श्रीलंकेतील ही मालिका युवा खेळाडूंना स्वतःला सिद्ध करण्यासाठी महत्त्वाची संधी ठरणार आहे. आगामी वरिष्ठ भारतीय संघाच्या दौऱ्यांच्या पार्श्वभूमीवर या स्पर्धेकडे विशेष लक्ष असणार आहे.

वैभव कशी करणार कामगिरी?

वैभवच्या निवडीनंतर अनेक माजी खेळाडू आणि तज्ज्ञांनी त्याच्या भवितव्याबाबत सकारात्मक प्रतिक्रिया दिल्या आहेत. राजस्थान रॉयल्सचे मुख्य प्रशिक्षक कुमार संगकारा यांनीही वैभव आंतरराष्ट्रीय क्रिकेटसाठी तयार असल्याचे मत व्यक्त केले आहे. त्याच्या फलंदाजीतील आत्मविश्वास आणि मोठे फटके मारण्याची क्षमता विशेष असल्याचे त्यांनी नमूद केले. आता आयपीएलमधील यशानंतर वैभव सूर्यवंशीसमोर भारत अ संघासाठी दमदार कामगिरी करण्याचे मोठे आव्हान असणार आहे. श्रीलंका दौऱ्यात तो कशी छाप पाडतो याकडे क्रिकेटप्रेमींचे लक्ष लागले आहे. या मालिकेतील यश त्याला लवकरच वरिष्ठ भारतीय संघात स्थान मिळवून देऊ शकते, अशीही चर्चा क्रिकेट वर्तुळात सुरू झाली आहे.