मुंबई क्रिकेट टीमच्या ड्रेसिंग रूममध्ये सचिन तेंडुलकरसोबत घालवलेले क्षण माझ्या करिअरमधील सर्वात अनमोल अनुभव असल्याचं सूर्यकुमार यादवने सांगितलं. सचिनने त्याची स्वतःची खास जागा मला कशी दिली, याची आठवण सूर्याने शेअर केली.

मुंबई : मुंबई क्रिकेट टीमच्या ड्रेसिंग रूममध्ये महान फलंदाज सचिन तेंडुलकरसोबत घालवलेले क्षण माझ्या करिअरमधील सर्वात अनमोल अनुभव असल्याचं सूर्यकुमार यादवने म्हटलंय. मुंबईच्या ड्रेसिंग रूममध्ये सचिनने त्याची स्वतःची जागा मला कशी दिली, याची आठवण सूर्याने शेअर केली. सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये मुंबईचं नेतृत्व करण्याआधी एका कार्यक्रमात सूर्याने हे खास क्षण आठवले.

२०१०-११ च्या काळात जेव्हा एक युवा खेळाडू म्हणून सूर्यकुमार यादव पहिल्यांदा मुंबईच्या ड्रेसिंग रूममध्ये गेला होता, तेव्हा तिथे सचिन तेंडुलकर, अमोल मुझुमदार आणि अजित आगरकर यांसारखे दिग्गज खेळाडू होते. त्यावेळेस ड्रेसिंग रूमच्या उजव्या कोपऱ्यात असलेली आपली जागा सचिनने सूर्यासाठी सोडली. सचिन नेहमी त्याच ठिकाणी बसायचा आणि तिथे त्याने गणपतीची एक छोटी मूर्ती ठेवली होती. सचिन अत्यंत श्रद्धेने ज्या जागेवर बसायचा ती जागा त्याने सूर्याला दिली. हा प्रसंग माझ्या आयुष्यातील अत्यंत महत्त्वाचा क्षण असल्याचं सूर्यकुमार मानतो.

वर्षे उलटली आणि आता मी पुन्हा एकदा मुंबई टीमचा कॅप्टन झालोय, या काळात खूप काही बदलल्याचं सूर्या म्हणाला. मुंबईच्या ड्रेसिंग रूममध्ये आता जे युवा खेळाडू आहेत, ते खूप टॅलेंटेड आणि कष्टाळू आहेत. त्यांना सपोर्ट करण्यासाठी माझ्या रूमचे दरवाजे नेहमीच उघडे असतात. आपण सर्वांनी एकत्र कसं पुढे जाता येईल, यावर मी त्यांच्याशी चर्चा करत असतो, असं सूर्याने स्पष्ट केलं.