लेस्टरशायर क्रिकेट क्लबला खराब पिचमुळे ५००० पौंडचा दंड आणि २७ पॉइंट्सची कपात सहन करावी लागली आहे. ग्राऊंड्समन कॅलम लेविनने याला 'दादा' बायोपिकच्या शूटिंगला जबाबदार धरलं, पण पॅनेलने हे कारण फेटाळलं.
इंग्लंड: भारताचा माजी कर्णधार आणि दिग्गज फलंदाज सौरव गांगुलीचा बायोपिक सध्या वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. इंग्लंडच्या लेस्टरशायर क्रिकेट क्लबला ५००० पौंड (सुमारे ६.४३ लाख रुपये) इतका मोठा दंड आणि २७ पॉइंट्सची कपात करण्यात आली आहे.
लेस्टरशायरचा संघ सध्या काउंटी चॅम्पियनशिप डिव्हिजन १ मध्ये खेळत आहे. क्रिकेट शिस्तपालन समितीने (Cricket Discipline Panel) केलेल्या या कठोर कारवाईमुळे त्यांना आता डिव्हिजन २ मध्ये जाण्यापासून वाचण्यासाठी मोठी धडपड करावी लागत आहे. १३ पैकी फक्त २ सामने जिंकून ९२ पॉइंट्ससह लेस्टरशायर सध्या पॉइंट्स टेबलमध्ये सर्वात तळाला आहे.
या क्लबचं होम ग्राऊंड असलेलं अप्टनस्टील ग्रेस रोड (Uptonsteel Grace Road) मैदान आता वादाचं केंद्र बनलं आहे. ग्लॅमॉर्गनविरुद्धच्या सामन्यात इथल्या पिचवर चेंडूचा बाऊन्स खूपच धोकादायक आणि अनपेक्षित होता. त्यामुळे मॅच अधिकाऱ्यांनी या पिचला 'खराब' (poor) असा दर्जा दिला.
गांगुलीच्या बायोपिकच्या अचानक ठरलेल्या शूटिंगमुळे पिचच्या तयारीत अडथळा
राजकुमार राव मुख्य भूमिकेत असलेल्या सौरव गांगुलीच्या 'दादा' या बायोपिकच्या शूटिंगमुळे हा अनपेक्षित क्रीडा वाद निर्माण झाला आहे. ग्रेस रोड मैदानावरील स्क्वेअरचा वापर शूटिंग क्रूने केल्यामुळे ही अडचण आली.
लेस्टरशायरचे मुख्य ग्राऊंड्समन कॅलम लेविन यांनी सांगितलं की, या अचानक ठरलेल्या शूटिंगमुळे पिच तयार करण्याच्या कामात मोठा व्यत्यय आला. ग्लॅमॉर्गनविरुद्धच्या सामन्याआधी पिचवर रोलिंग करण्यासाठी आणि ते व्यवस्थित तयार करण्यासाठी त्यांना पुरेसा वेळच मिळाला नाही.
"आम्ही यावेळी वापरलेलं पिच खेळण्यासाठी दिलं होतं. १० आठवड्यांपूर्वी त्यावर दोन टी-२० सामने झाले होते. सामन्यापूर्वी अशा अनेक गोष्टी घडल्या ज्या माझ्या नियंत्रणाबाहेर होत्या, जसं की तापमान ३५ अंश असणं," असं लेविन यांनी क्रिकेट रेग्युलेटरला सांगितलं.
"ग्लॅमॉर्गनविरुद्धच्या सामन्याच्या चार दिवस आधी अचानक एका बॉलिवूड सिनेमाचं शूटिंग ठरलं. त्यावेळी मला पिचवर कोणतंही काम करू दिलं नाही. मला पिच कव्हर करण्याची किंवा इतर कोणतीही परवानगी नव्हती," असंही ते पुढे म्हणाले.
'दादा' सिनेमाच्या यूके शेड्युलचं शूटिंग जुलै २०२६ मध्ये सुरू झालं. राजकुमार राव आणि सिनेमाच्या टीमने लेस्टरशायरच्या अप्टनस्टील ग्रेस रोडवर शूटिंग केलं. हे शूटिंग ग्लॅमॉर्गनविरुद्धच्या सामन्याच्या बरोबर चार दिवस आधी झालं. शूटिंगदरम्यान ग्राऊंड्समन कॅलम लेविन यांना पिच कव्हर करता आलं नाही किंवा त्यावर काम करता आलं नाही, त्यामुळे पिच खूप जास्त कोरडं पडलं.
पण, क्रिकेट शिस्तपालन समितीने शूटिंगचं हे कारण फेटाळून लावलं. शूटिंग फक्त एकच दिवस चाललं होतं, असं समितीने स्पष्ट केलं.
निर्णयाविरोधात अपील करण्यासाठी लेस्टरशायरला १० दिवसांची मुदत
लेस्टरशायरने दुजोरा दिला आहे की क्रिकेट शिस्तपालन समितीने त्यांच्यावर मोठा दंड आणि काउंटी चॅम्पियनशिपच्या एकूण पॉइंट्समधून २७ पॉइंट्सची कपात केली आहे. आता या निर्णयाविरोधात अपील करण्यासाठी क्लबकडे १० दिवसांचा वेळ आहे.
"क्रिकेट शिस्तपालन समितीच्या निर्णयाची क्लबने नोंद घेतली आहे. यामध्ये ८ पॉइंट्सची कपात, २०२७ च्या सीझन संपेपर्यंत निलंबित असलेली अतिरिक्त ८ पॉइंट्सची कपात आणि ५००० पौंडचा आर्थिक दंड यांचा समावेश आहे," असं लेस्टरशायरने एका निवेदनात म्हटलं आहे.
"समितीच्या या निर्णयानंतर, क्लब आपली भूमिका तपासत असून उपलब्ध असलेल्या सर्व पर्यायांचा विचार करत आहे," असंही क्लबने पुढे सांगितलं.
दरम्यान, काउंटी चॅम्पियनशिपचा सीझन आता संपत आला आहे. त्यामुळे टॉप टियरमध्ये आपलं स्थान टिकवून ठेवण्यासाठी आणि तळाला जाण्यापासून वाचण्यासाठी लेस्टरशायरला आता हॅम्पशायर आणि वॉरविकशायरविरुद्धचे सामने जिंकणं अत्यंत गरजेचं आहे.
