Asia Cup 2025 Ind vs Pak: नाणेफेक जिंकून पाकला फलंदाजीसाठी आमंत्रित केल्यानंतर भारताला हार्दिक पांड्याने अपेक्षित सुरुवात करून दिली. पांड्याने टाकलेल्या डावाच्या पहिल्याच षटकातील तिसऱ्या चेंडूवर साहिबजादा फरहानचा झेल थर्ड मॅनवर अभिषेक शर्माने सोडला.
दुबई: आशिया चषकाच्या सुपर फोर सामन्यात भारतासमोर पाकिस्तानची चांगली सुरुवात झाली आहे. नाणेफेक हरल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना पाकिस्तानने शेवटचे वृत्त हाती आले तेव्हा सात षटकांत एका विकेटच्या मोबदल्यात ६० धावा केल्या होत्या. साहिबजादा फरहान २५ चेंडूत ३१ धावांवर आणि सईम अयुब ९ चेंडूत ११ धावांवर खेळत आहेत. ९ चेंडूत ५ धावा करणाऱ्या फखर जमानची विकेट पाकिस्तानने पॉवर प्लेमध्ये गमावली. हार्दिक पांड्याच्या चेंडूवर फखरला यष्टिरक्षक संजू सॅमसनने अप्रतिम झेल घेऊन बाद केले.
सुटलेला झेल आणि खराब सुरुवात
नाणेफेक जिंकून पाकिस्तानला फलंदाजीसाठी आमंत्रित केल्यानंतर भारताला हार्दिक पांड्याने अपेक्षित सुरुवात करून दिली. पांड्याने टाकलेल्या डावाच्या पहिल्याच षटकातील तिसऱ्या चेंडूवर साहिबजादा फरहानचा झेल थर्ड मॅनवर अभिषेक शर्माने सोडला. त्यानंतर पहिल्या षटकात सहा धावा करणाऱ्या पाकिस्तानने दुसऱ्या षटकात जसप्रीत बुमराहवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. बुमराहने टाकलेल्या दुसऱ्या षटकात दोन चौकारांसह ११ धावा करत फखर जमानने पाकिस्तानला चांगली सुरुवात करून दिली. तिसऱ्या षटकाच्या पहिल्या चेंडूवरही हार्दिक पांड्याविरुद्ध फखरने चौकार मारून धोका निर्माण केला, पण पुढच्याच चेंडूवर पांड्याने फखरला यष्ट्यांमागे संजूच्या हाती झेलबाद करून बदला घेतला. पांड्याच्या स्लो बॉलवर एज लागलेला चेंडू जमिनीला लागण्यापूर्वीच संजूने ग्लोव्हजमध्ये पकडला.
रिप्ले तपासल्यानंतर पंचांनी फखरला बाद घोषित केले. विकेट गमावूनही पांड्याच्या षटकात ९ धावा करणाऱ्या पाकिस्तानने जसप्रीत बुमराहने टाकलेल्या पॉवरप्लेच्या चौथ्या षटकात दोन चौकारांसह १० धावा केल्या. अभिषेकने सुरुवातीला सोडलेला झेल शाहिबजादा फरहानने बुमराहला दोनदा चौकार मारून वसूल केला. पहिल्या दोन षटकांत बुमराहने २१ धावा दिल्यामुळे कर्णधार सूर्यकुमार यादवने पाचव्या षटकात वरुण चक्रवर्तीला गोलंदाजी दिली. वरुणच्या चेंडूवर साहिबजादा फरहानने दिलेला सोपा झेल शॉर्ट फाइन लेगवर कुलदीप यादवने टाकला. त्यानंतर वरुणला चौकार मारून साहिबजादाने पाकिस्तानला पाच षटकांत ४२ धावांपर्यंत पोहोचवले. पॉवर प्लेच्या शेवटच्या षटकात आलेल्या बुमराहविरुद्ध दोन चौकारांसह १३ धावा करत पाकिस्तानने ५० धावांचा टप्पा ओलांडला. पॉवरप्लेमध्ये ३ षटके टाकणाऱ्या बुमराहने ३४ धावा दिल्या.
पाकिस्तान प्लेइंग इलेव्हन: सईम अयुब, साहिबजादा फरहान, फखर जमान, सलमान आघा (कर्णधार), हुसेन तलत, मोहम्मद हॅरिस (यष्टिरक्षक), मोहम्मद नवाज, फहीम अश्रफ, शाहीन आफ्रिदी, हॅरिस रौफ, अबरार अहमद.
भारत प्लेइंग इलेव्हन: अभिषेक शर्मा, शुभमन गिल, सूर्यकुमार यादव (कर्णधार), तिलक वर्मा, संजू सॅमसन, शिवम दुबे, हार्दिक पांड्या, अक्षर पटेल, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, वरुण चक्रवर्ती.


