एमएस धोनी आता चेन्नई सुपर किंग्सचा मेंटॉर असणार आहे. या नव्या इनिंगसाठी त्याची पत्नी साक्षीने इंस्टाग्रामवर एक खास आणि भावुक पोस्ट शेअर केली आहे.
मुंबई : महेंद्रसिंग धोनीची पत्नी साक्षी धोनीने तिच्या पतीसाठी एक अत्यंत भावुक नोट लिहिली आहे. चेन्नई सुपर किंग्सने (CSK) धोनीला टीमचा मेंटॉर बनवल्याची घोषणा केली. फ्रँचायझीसोबतच्या त्याच्या प्रदीर्घ प्रवासातील हा एक नवा अध्याय आहे. साक्षीने इंस्टाग्रामवर ही पोस्ट शेअर केली असून, यात माहीच्या प्रवासातील एका महत्त्वाच्या टप्प्याची सांगता आणि नव्या सुरुवातीची चाहूल दिसते.
साक्षीने लिहिले, "काही सुंदर नवीन अध्याय सुरू करण्यासाठी जुने अध्याय संपावे लागतात. ज्यांनी वर्षानुवर्षे माहीवर प्रेम केले, पाठिंबा दिला आणि विश्वास ठेवला, त्या सर्वांना मनापासून धन्यवाद. मग आम्ही तुम्हाला वैयक्तिकरित्या ओळखत असू किंवा नसू." ती पुढे म्हणाली, "या सर्व प्रेमासाठी आम्ही नेहमीच कृतज्ञ राहू. नवीन सुरुवात, नवीन साहस आणि आणखी अनेक सुंदर आठवणींसाठी चीयर्स."
धोनीने १७ सीझन CSK साठी खेळले आहेत. मंगळवारी फ्रँचायझीने स्पष्ट केले की, आयपीएल २०२७ सीझनपूर्वी धोनी टीम मेंटॉर म्हणून नवीन भूमिकेत दिसेल. धोनीच्या क्रिकेट प्रवासातील हा मोठा बदल आहे. २००८ मध्ये सुरू झालेल्या धोनीच्या अद्भुत आयपीएल करिअरचा यामुळे पडदा पडत आहे. स्पर्धेच्या सुरुवातीपासूनच धोनी आयपीएलचा एक प्रमुख चेहरा राहिला आहे. ४५ वर्षीय धोनी एक कर्णधार, फिनिशर आणि स्पर्धेतील सर्वात प्रभावशाली खेळाडू म्हणून आपला कायमस्वरूपी ठसा सोडून जात आहे.







