२०२७ च्या आयपीएलपर्यंत रोहित शर्मा ४० वर्षांचा होईल. त्यामुळे तो मुंबई इंडियन्सच्या जर्सीत आणखी किती काळ खेळेल, हे अद्याप स्पष्ट नाही.

मुंबई : हार्दिक पांड्याची एन्ट्री आणि कॅप्टन्सीची मागणी. त्यानंतर रोहित शर्माला मुंबई इंडियन्सच्या कर्णधारपदावरून हटवण्यात आलं. इथं या कथेचा पहिला भाग संपतो. दुसऱ्या भागाची सुरुवात होते ती रोहितच्या नेतृत्वात भारताने जिंकलेल्या २०२४ च्या टी-२० वर्ल्ड कपपासून. त्यानंतर २०२५ मध्ये चॅम्पियन्स ट्रॉफीचं टार्गेट आहे.

एकीकडे रोहितची कॅप्टन्सी ऐतिहासिक ठरली, तर दुसरीकडे तगडी टीम असूनही हार्दिक पांड्या कॅप्टन म्हणून फ्लॉप ठरला. सलग दोन-तीन सीझन टीम पॉईंट्स टेबलमध्ये तळाला राहिली. अखेर मॅनेजमेंटने रोहितला पुन्हा कॅप्टन्सी घेण्याची विनंती केली. मग पुढे काय होतं?

मुंबई इंडियन्सचा कोचिंग स्टाफ पूर्णपणे बदलला जातोय. पोलार्ड, उथप्पा, मॅक्लेनघन, कुलकर्णी आणि टी. दिलीप हे सगळे रोहितच्या मर्जीतले लोक आले. जर ट्रेड शक्य झाला नाही, तर रोहितच्या अंडर खेळायला हार्दिकनेही होकार दिलाय. जणू काही काळाने सगळं चक्र फिरवलंय. एकदम सिनेमासारखी स्टोरी!

मैदानाबाहेर मुंबई इंडियन्समध्ये जे काही घडलं, ते एखाद्या सस्पेन्स थ्रिलरपेक्षा कमी नाही. अजून अधिकृत घोषणा झालेली नाही, पण २०२७ च्या आयपीएलमध्ये रोहितच मुंबईचं नेतृत्व करेल, असे स्पष्ट संकेत आहेत. इथं रोहितचं वय किंवा त्याच्या क्षमतेवर शंका घेण्याचा प्रश्नच नाही. पण त्याला पुन्हा कॅप्टन बनवण्याचा निर्णय खरंच योग्य आहे का, याचा विचार व्हायला हवा.

२०२७ चा आयपीएल सीझन येईल, तेव्हा रोहित ४० वर्षांचा झालेला असेल. तो मुंबईच्या जर्सीत आणखी किती काळ दिसेल, याची शाश्वती नाही. टीम अडचणीत असताना हा फक्त एक तात्पुरता उपाय (शॉर्ट टर्म सोल्युशन) आहे का? पण मॅनेजमेंटने इथं वेगळाच विचार केलाय.

हार्दिकच्या नेतृत्वात आता टीम खेळणार नाही, हे मॅनेजमेंटने पक्कं केलंय. मग पर्याय कोण? भारताला २०२६ चा टी-२० वर्ल्ड कप जिंकून देणारा सूर्यकुमार यादव, जसप्रीत बुमराह, मिचेल सँटनर आणि भविष्यातला स्टार मानला जाणारा तिलक वर्मा असे अनेक पर्याय आहेत.

सध्या देशांतर्गत क्रिकेटमध्येही सूर्याला फारशी संधी मिळत नाहीये. बुमराहला सतत दुखापतींचा त्रास असतो. सँटनर परदेशी खेळाडू असल्याने तो प्रत्येक मॅच खेळेलच याची गॅरंटी नाही. मुंबईच्या भविष्याचा विचार केला, तर तिलक वर्मा हा सर्वात योग्य पर्याय ठरतो. तो सध्या भारताच्या टी-२० टीमचा व्हाईस कॅप्टनही आहे. खुद्द रोहितनेही मॅनेजमेंटला तिलकचं नाव सुचवलं होतं, पण मॅनेजमेंट त्यासाठी तयार झाली नाही.

यामागे काही कारणं आहेत. मुंबई इंडियन्स ही आयपीएलमधली सर्वात स्टार खेळाडूंनी भरलेली टीम आहे. टीममध्ये बहुतांश सीनियर खेळाडू आहेत. रोहितला हटवून हार्दिकला कॅप्टन केल्यावर गेल्या तीन सीझनमध्ये काय राडा झाला, हे आपण पाहिलंच आहे. पाच वेळा चॅम्पियन असलेल्या फ्रँचायझीसाठी तीच चूक पुन्हा करणं नामुष्कीचं ठरेल.

रोहित पुन्हा कॅप्टन म्हणून आल्यावर हे सगळे वाद मॅनेजमेंटला सहज मिटवता येतील. कदाचित रोहित फक्त २०२७ च्या सीझनसाठीच कॅप्टन असेल. कारण २०२८ च्या सीझनआधी मेगा ऑक्शन होणार आहे. ऑक्शनमधून टीम नव्याने बांधता येईल आणि नवा कॅप्टनही शोधता येईल. रोहितकडे सध्या 'शॉर्ट टर्म क्रायसिस मॅनेजर' म्हणून पाहिलं जातंय. जर तिलक भविष्यातला कॅप्टन असेल, तर रोहित त्याला चांगल्या प्रकारे तयार (ग्रूम) करू शकतो.

पण हा निर्णय रोहितसाठी खरंच फायद्याचा आहे का? करिअरच्या शेवटच्या टप्प्यात असलेल्या रोहितचं अंतिम ध्येय काय आहे, हे अगदी स्पष्ट आहे. त्याचं टार्गेट २०२७ चा वनडे वर्ल्ड कप आहे, २०२७ चं आयपीएल नाही. गेल्या आयपीएलमध्ये रोहितला हॅमस्ट्रिंगची दुखापत झाली होती. त्यामुळे काही मॅचेस हुकल्या आणि नंतर तो 'इम्पॅक्ट प्लेयर' म्हणून खेळला.

रोहितने टी-२० आणि टेस्ट क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. त्यामुळे दोन वनडे सिरीजमध्ये त्याला चांगला ब्रेक मिळतो. वर्कलोड कमी झाल्याने दुखापतीचा धोकाही कमी झालाय. पण आयपीएलचा विचार केला, तर अवघ्या दोन महिन्यांत १४ ते १७ मॅचेस खेळाव्या लागतात. कॅप्टन झाल्यावर त्याला 'इम्पॅक्ट प्लेयर' म्हणूनही खेळता येणार नाही. सलग मॅचेस खेळल्यामुळे रोहितच्या फिटनेसवर परिणाम होईल का, हीच मोठी चिंता आहे.

२०२७ चा वनडे वर्ल्ड कप ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात सुरू होईल. आणि आयपीएल मे महिन्यात संपण्याची शक्यता आहे. मध्ये फक्त चार महिन्यांचा गॅप असेल. जर या काळात रोहितला एखादी गंभीर दुखापत झाली, तर वर्ल्ड कप जिंकण्याचं त्याचं मोठं स्वप्न अधुरंच राहू शकतं.