Ranji Trophy Maharashtra vs Kerala : धावफलकावर एकही धाव नसताना तीन विकेट, पाच धावांवर चार आणि १८ धावांवर पाच विकेट गमावून कोसळलेल्या महाराष्ट्राला सहाव्या विकेटसाठी १२२ धावांची भागीदारी करून जलज सक्सेना-ऋतुराज गायकवाड जोडीने सावरले.

Ranji Trophy Maharashtra vs Kerala : तिरुवनंतपुरम येथेरणजी ट्रॉफीमध्ये केरळविरुद्ध महाराष्ट्र संघ संघर्ष करत आहे. १८ धावांत ५ गडी गमावून अडचणीत सापडलेल्या महाराष्ट्राला सहाव्या विकेटसाठी शतकी भागीदारी रचून जलज सक्सेना-ऋतुराज गायकवाड जोडीने सावरले. पहिल्या दिवशी चहापानापूर्वी जलज सक्सेनाला बाद करून निधीश एम.डी.ने ही भागीदारी तोडली आणि केरळला सामन्यात पुनरागमन करून दिले. चहापानापर्यंत ऋतुराज गायकवाड ८३ धावांवर आणि विकी ओस्तवाल चार धावांवर खेळत होता. केरळकडून एम.डी. निधीशने चार तर एन.पी. बेसिलने दोन गडी बाद केले.

यापूर्वी धावफलकावर एकही धाव नसताना तीन विकेट, पाच धावांवर चार आणि १८ धावांवर पाच विकेट गमावून कोसळलेल्या महाराष्ट्राला सहाव्या विकेटसाठी १२२ धावांची भागीदारी करून जलज सक्सेना-ऋतुराज गायकवाड जोडीने सावरले. १०६ चेंडूंत ४९ धावा करणाऱ्या जलज सक्सेनाला निधीशने पायचीत पकडून ही भागीदारी तोडली आणि केरळला दिलासा दिला. आता महाराष्ट्राच्या आशा शतकाच्या दिशेने वाटचाल करणाऱ्या ऋतुराज गायकवाडवर अवलंबून आहेत.

महाराष्ट्राला धक्का देत केरळची दमदार सुरुवात

नाणेफेक हारल्यानंतर फलंदाजीसाठी उतरलेल्या महाराष्ट्राला पहिल्याच षटकात धक्का बसला. या मोसमात मुंबई सोडून महाराष्ट्राकडून खेळायला आलेल्या पृथ्वी शॉला निधीशने चौथ्याच चेंडूवर शून्यावर बाद करून पहिला धक्का दिला. पुढच्याच चेंडूवर अर्शिन कुलकर्णीलाही बाद करून निधीशने दुहेरी धक्का दिला. पुढच्याच षटकात एन.पी. बेसिलने सिद्धेश वीरला गोल्डन डकवर बाद केल्याने धावफलकावर धावा लागण्यापूर्वीच महाराष्ट्राचे ३ गडी बाद झाले. चौथ्या षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर कर्णधार अंकित बावणेलाही बेसिलने बाद केल्याने महाराष्ट्राची अवस्था ४ बाद ५ धावा झाली. त्यानंतर ऋतुराज आणि सौरभ नवाले यांनी महाराष्ट्राला दुहेरी धावसंख्येपर्यंत पोहोचवले, पण नवाले (१२) याला बाद करून निधीशने पाहुण्या संघाची अवस्था ५ बाद १८ अशी केली.

ऋतुराज-सक्सेना जोडीने डाव सावरला

मागील हंगामापर्यंत केरळचा तारणहार असलेला जलज सक्सेना या वेळी संघ बदलूनही तारणहाराच्या भूमिकेत दिसला. ऋतुराज गायकवाडसोबत मिळून महाराष्ट्राला मोठ्या पडझडीतून बाहेर काढणाऱ्या जलजने संघाचा डाव सावरला. केरळसाठी निधीश एम.डी.ने १३ धावांत तीन बळी घेतले, तर एन.पी. बेसिलने ३१ धावांत दोन बळी घेतले. तत्पूर्वी, नाणेफेक जिंकून केरळने प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला होता. मोहम्मद अझरुद्दीनच्या नेतृत्वाखालील संघात संजू सॅमसनचाही प्लेइंग इलेव्हनमध्ये समावेश आहे.