PAK vs UAE: पाकिस्तान आणि यूएई यांच्यात रात्री ८ वाजता दुबईत 'करो या मरो' सामना होणार आहे, पण त्याआधीच पाकिस्तान क्रिकेट संघाने आशिया कप २०२५ वर बहिष्कार टाकल्याची बातमी समोर येत आहे. 

Pakistan Boycott Asia Cup 2025: आशिया कप २०२५ चा दहावा सामना पाकिस्तान आणि यूएई यांच्यात दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर खेळवला जाणार आहे, पण त्याआधीच एक मोठी बातमी समोर येत आहे. जिओ न्यूजच्या वृत्तानुसार, ग्रुप स्टेजच्या या निर्णायक सामन्यापूर्वी पाकिस्तान संघाने आशिया कपवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे. टीम इंडियाच्या खेळाडूंनी सामन्यादरम्यान हस्तांदोलन न केल्यामुळे पाकिस्तान संघाने हा निर्णय घेतला आहे.

जिओ न्यूजच्या वृत्तानुसार, पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने आपल्या खेळाडूंना हॉटेलमध्येच राहण्याचे निर्देश दिले आहेत. सर्व खेळाडूंना त्यांच्या खोलीतच राहण्याचा सल्ला देण्यात आला आहे. याशिवाय, त्यांचे किट आणि इतर आवश्यक साहित्य टीम बसमध्येच राहणार असल्याचे सांगितले जात आहे. तथापि, पीसीबी किंवा आशिया क्रिकेट कौन्सिलकडून याबाबत कोणतीही अधिकृत पुष्टी करण्यात आलेली नाही. या परिस्थितीबाबत लवकरच तातडीची पत्रकार परिषद होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

रात्री ८ वाजता सुरू होणार आहे पाकिस्तान आणि यूएईचा सामना

पाकिस्तान आणि यूएई यांच्यातील सामना भारतीय वेळेनुसार रात्री ८ वाजता सुरू होणार आहे, तर दुबईत स्थानिक वेळेनुसार सायंकाळी ६ वाजता सुरू होईल. काही मिनिटांपूर्वीच ही मोठी आणि धक्कादायक बातमी समोर आली आहे. यूएईचा संघ स्टेडियमसाठी रवाना झाला आहे. तर, पाकिस्तानचा संघ अद्याप न आल्याने या वृत्ताला आणखी बळकटी मिळत आहे. पाकिस्तान या स्पर्धेतून आपले नाव मागे घेण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

पाकिस्तान संघाने केली होती मॅच रेफ्रीला हटवण्याची मागणी

मॅच रेफ्री अँडी पायक्रॉफ्ट यांना पदावरून हटवण्याचा अयशस्वी प्रयत्न केल्यानंतर पीसीबीने हा निर्णय घेतला आहे. पाकिस्तानच्या औपचारिक विनंतीनंतरही, आयसीसी आपल्या निर्णयावर ठाम राहिली आणि अनुभवी रेफ्रीला पदावरून हटवण्यास नकार दिला.