IPL 2026 Mumbai Indians Update: मुंबई इंडियन्सने तब्बल १४ वर्षांनंतर आयपीएल हंगामातील आपला पहिला सामना जिंकण्याचा पराक्रम केला आहे. वानखेडेवर झालेल्या सामन्यात, रोहित शर्मा आणि रायन रिकल्टन यांच्या स्फोटक अर्धशतकांच्या जोरावर मुंबईने कोलकत्ता नाईट रायडर्सने दिलेले २२२ धावांचे लक्ष्य ६ गडी राखून पार केले.

मुंबई: मुंबई इंडियन्स आणि 'पहिला सामना' याचं समीकरण गेल्या १४ वर्षांपासून चाहत्यांच्या काळजाचा ठोका चुकवत होतं. पण २०२६ च्या हंगामात इतिहास बदलला आहे! वानखेडेच्या ऐतिहासिक मैदानावर कोलकत्ता नाईट रायडर्सचा (KKR) ६ गडी राखून धुव्वा उडवत पलटनने तब्बल १४ वर्षांचा 'दुष्काळ' संपवला आहे. २२१ धावांचे डोंगरसम लक्ष्य पार करत मुंबईने खऱ्या अर्थाने 'चॅम्पियन' सुरुवात केली आहे.

Add Asianetnews Marathi as a Preferred SourcegooglePreferred

रोहित-रायनची 'फायर' सुरुवात

२२२ धावांचा पाठलाग करताना मुंबईला तुफानी सुरुवातीची गरज होती. 'हिटमॅन' रोहित शर्मा आणि रायन रिकल्टन यांनी मैदानावर चौफेर फटकेबाजी करत केकेआरच्या गोलंदाजांना हतबल केले. रोहितने केवळ २३ चेंडूत अर्धशतक झळकावून इरादे स्पष्ट केले. त्याने ३८ चेंडूत ७८ धावांची (६ षटकार, ६ चौकार) आक्रमक खेळी केली. दुसऱ्या बाजूला रिकल्टननेही २५ चेंडूत पन्नास पूर्ण करत ४३ चेंडूत ८१ धावांची मॅचविनिंग इनिंग खेळली.

मध्यफळीची झुंज आणि हार्दिकचा 'फिनिशिंग टच'

रोहित बाद झाल्यानंतर सूर्यकुमार यादव (१६) स्वस्तात परतला, ज्यामुळे काही काळ चिंतेचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र, तिलक वर्माने (२०) संयमी साथ दिली. सामना शेवटच्या टप्प्यात असताना तिलक बाद झाला, पण कर्णधार हार्दिक पांड्याने खेळपट्टीवर उभे राहत विजयाची औपचारिकता पूर्ण केली आणि मुंबईला ऐतिहासिक विजय मिळवून दिला.

१४ वर्षांचा 'वनवास' संपला!

आयपीएलच्या इतिहासात २०१२ पासून मुंबई इंडियन्सला आपला हंगामातील पहिला सामना जिंकता आला नव्हता. हा 'नकोसा' विक्रम मोडीत काढण्यासाठी मुंबईला १४ वर्षे वाट पाहावी लागली. आजच्या विजयाने केवळ दोन गुण मिळाले नाहीत, तर मुंबईने आपल्या मानसिक अडथळ्यावरही मात केली आहे.