भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाचव्या कसोटीत यशस्वी जैस्वालने वेळकाढूपणा केल्याने रिकी पाँटिंगने नाराजी व्यक्त केली आहे. लॉर्ड्स कसोटीत इंग्लंडच्या फलंदाजांनी केलेल्या कृतीवर भारताने आक्षेप घेतल्यानंतर जैस्वालने असे कृत्य केल्याने वाद निर्माण झाला आहे.
भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाचव्या कसोटीच्या तिसऱ्या दिवशी भारताचा युवा फलंदाज यशस्वी जैस्वाल याने केलेल्या 'वेळेचा अपव्यय' करणाऱ्या कृतीवर ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पाँटिंग याने नाराजी व्यक्त केली आहे.
पाचव्या कसोटीच्या तिसऱ्या दिवशी पहिल्या सत्राच्या शेवटच्या क्षणी शुभमन गिलने चौकार मारल्यानंतर, एक दुहेरी धाव घेण्यासाठी चेंडूला धक्का दिला. मात्र, दुसऱ्या धावेसाठी धावल्यानंतर नॉन-स्ट्रायकरच्या दिशेने उभ्या असलेल्या यशस्वी जैस्वालने आपल्या हॅमस्ट्रिंगकडे बोट दाखवत लंगडण्यास सुरुवात केली. जैस्वालने जाणीवपूर्वक वेळ घालवल्याने सत्रातील शेवटचे षटक पूर्ण झाले आणि जेवणाराची वेळ झाली. लंच ब्रेकसाठी परत येत असताना जैस्वाल सामान्यपणे चालताना दिसला. त्यामुळे इंग्लंडच्या खेळाडूंनी यावर तीव्र प्रतिक्रिया दिली.
या वेळी, इंग्लंडचा खेळाडू बेन डकेट याच्यासोबत बाचाबाची झाली. जैस्वाल आणि डकेट यांच्यात जोरदार शाब्दिक चकमक झाली. हा वाद वाढू नये म्हणून शुभमन गिलने जैस्वालला शांत केले. या प्रकारानंतर पाँटिंगने आपली नाराजी व्यक्त केली आणि लॉर्ड्स कसोटीतील घटनेचा संदर्भ दिला.
स्काय स्पोर्ट्सला दिलेल्या मुलाखतीत पाँटिंग म्हणाला, "त्याने शेवटच्या षटकात जो वेळ वाया घालवला, ते मला अजिबात आवडले नाही. विशेषतः लॉर्ड्समध्ये इंग्लंडच्या फलंदाजांनी केलेल्या कृत्यावर भारताने आक्षेप घेतल्यानंतर हा प्रकार घडला."
या घटनेवर इंग्लंडचा माजी वेगवान गोलंदाज स्टुअर्ट ब्रॉड याने मात्र वेगळे मत मांडले. तो म्हणाला, "या मालिकेत घडलेल्या या सर्व नाट्यमय घडामोडी, ज्यामुळे आपल्याला हसू येते, त्या मला खूप आवडतात."
भारत आणि इंग्लंड यांच्यात पाच सामन्यांच्या मालिकेत अशा प्रकारची शाब्दिक चकमक होण्याची ही पहिलीच वेळ नाही. लॉर्ड्स येथे झालेल्या तिसऱ्या कसोटीच्या तिसऱ्या दिवशीही असाच तणाव पाहायला मिळाला होता. तेव्हा, जसप्रीत बुमराहच्या गोलंदाजीवेळी इंग्लंडचा सलामीवीर झॅक क्रॉलीने जाणीवपूर्वक वेळ वाया घालवण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप भारताने केला होता. यावर शुभमन गिलने क्रॉलीला शिवीगाळ करत नाराजी व्यक्त केली होती.
त्यानंतर चौथ्या कसोटीच्या अंतिम दिवशी सामना अनिर्णित राहण्याच्या शक्यता असताना इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्स याने रविंद्र जडेजा आणि वॉशिंग्टन सुंदर यांना सामना थांबवण्याचा प्रस्ताव दिला होता. मात्र, हे दोघेही आपापल्या शतकाजवळ असल्यामुळे त्यांनी प्रस्ताव नाकारला. स्टंप माइकवर स्टोक्सचे म्हणणे ऐकू आले, "जड्डू, तुला ब्रूक आणि डकेटविरुद्ध शतक करायचे आहे का?" यावर जडेजाने, "मी आता सोडून जाऊ का?" असे उत्तर दिले. क्रॉलीनेही यात हस्तक्षेप करत, "तू हात मिळवून जाऊ शकतोस," असे म्हटले.
त्यानंतर जडेजा आणि सुंदर यांनी आपली शतके पूर्ण केली आणि मगच दोन्ही संघांच्या खेळाडूंनी हात मिळवत सामना अनिर्णित म्हणून स्वीकारला. त्यावेळी इंग्लंडच्या या कृतीवर चाहत्यांनी आणि माजी क्रिकेटपटूंनी जोरदार टीका केली होती.


