२०१८ च्या सँडपेपर गेट प्रकरणात क्रिकेट ऑस्ट्रेलियाने केलेल्या चौकशीवर डेव्हिड वॉर्नरने प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. या प्रकरणात प्रमुख गोलंदाजांची चौकशी झाली नसल्याचा दावा करत त्याने उस्मान ख्वाजाचे समर्थन केले आहे.

मुंबई : ऑस्ट्रेलियाचा माजी सलामीवीर डेव्हिड वॉर्नरने क्रिकेट ऑस्ट्रेलियाच्या (CA) २०१८ च्या बॉल-टेम्परिंग (सँडपेपर गेट) चौकशीवर गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत. गोलंदाजांना या घटनेची माहिती नव्हती, हे सिद्ध करण्यासाठी क्रिकेट ऑस्ट्रेलियाने सदोष चौकशी केल्याचा आरोप वॉर्नरने केला आहे. इन्स्टाग्रामवर एका पोस्टद्वारे त्याने म्हटले आहे की, २०१८ च्या चौकशीत जोश हेझलवूड, मिचेल स्टार्क आणि नॅथन लायन या गोलंदाजांची अजिबात चौकशी करण्यात आली नाही.

"माझ्या माहितीनुसार, सीएने २०१८ च्या चौकशीत जोश हेझलवूड, मिचेल स्टार्क किंवा नॅथन लायन यांची चौकशी केली नाही. जर हे खरं असेल, तर गोलंदाजांना काहीच माहिती नव्हती हा दावा सीए कसा काय करू शकते? हे असंच दिसतंय की त्यांनी आधीच ठरवून ठेवलं होतं कुणाला जबाबदार धरायचं. त्यासाठी त्यांनी वरवरची चौकशी केली आणि आता ते खोटा दावा करत आहेत की गोलंदाजांना काहीच माहित नव्हतं. यात स्पष्टपणे लपवाछपवी दिसतेय," असं वॉर्नरने इन्स्टाग्राम पोस्टमध्ये लिहिलं आहे.

याआधी, ऑस्ट्रेलियाचा कसोटी कर्णधार पॅट कमिन्सने उस्मान ख्वाजाच्या आत्मचरित्रातील २०१८ च्या सँडपेपर गेट प्रकरणावरील दाव्यांना फेटाळल्यानंतर वॉर्नरने कमिन्सवर टीका केली होती. कमिन्सने शुक्रवारी पत्रकार परिषदेत ख्वाजाचे दावे फेटाळले होते. पण वॉर्नरने ख्वाजाची बाजू घेत म्हटलं की, "मी उस्मान ख्वाजाच्या पाठीशी आहे. त्याने पुस्तकात जे काही लिहिलं आहे ते खरं आहे आणि मी त्याला पूर्ण पाठिंबा देतो. मला खरंच वाईट वाटतं की आज कर्णधाराने ख्वाजाला एकटं पाडलं आणि या गोष्टीची मला खूप निराशा झाली आहे."

वॉर्नर पुढे म्हणाला की तो स्वतः, तत्कालीन कर्णधार स्टीव्ह स्मिथ (ज्यावर एक वर्षाची बंदी होती) आणि कॅमेरून बॅनक्रॉफ्ट (ज्यावर नऊ महिन्यांची बंदी होती) यांनी या प्रकरणाची खूप मोठी किंमत मोजली आहे. "आम्ही तिघांनी याची मोठी किंमत मोजली आहे. मी कॅमेरून बॅनक्रॉफ्टशी आठ वर्षे बोललो नव्हतो, पण आम्हाला रोज या परिणामांना सामोरे जावे लागते. आम्हाला आजीवन शिक्षा मिळाली आहे. जेव्हा इतर लोक म्हणतात की त्यांच्यावर याचा काय परिणाम झाला, तेव्हा मला, स्टीव्ह आणि कॅमेरूनला दररोज ज्या गोष्टींना सामोरे जावे लागते, त्यापेक्षा वाईट काहीच नाही." वॉर्नरने शेवटी सांगितलं की, "आम्ही शिव्या खाल्ल्या. होय, आम्ही ते मान्य केलं. पण माझी पत्नी आणि मी याची सर्वात मोठी किंमत मोजली - त्या काळात आम्ही एक बाळ गमावलं. म्हणूनच जोपर्यंत सत्य स्वीकारलं जात नाही, तोपर्यंत हे मला सर्वात जास्त दुखवत राहील."