गौतम गंभीरच्या नेतृत्वाखालील टीम इंडियात चमकणारा हर्षित राणा आणि नुकताच टी-२० संघात परतलेला अनुभवी भुवनेश्वर कुमार यांना रहाणेने आपल्या यादीत स्थान दिले नाही.
मुंबई : पुढच्या वर्षी दक्षिण आफ्रिका, झिम्बाब्वे आणि नामिबियामध्ये होणाऱ्या २०२७ च्या एकदिवसीय विश्वचषकासाठी भारताचा माजी कर्णधार अजिंक्य रहाणेने आपली ५ वेगवान गोलंदाजांची फळी निवडली आहे. जसप्रीत बुमराहच्या नेतृत्वाखालील या गोलंदाजीत रहाणेने युवा खेळाडूंना पसंती दिली असून मोहम्मद शमी आणि भुवनेश्वर कुमार यांसारख्या दिग्गज गोलंदाजांना डच्चू दिला आहे. तसेच, युवा गोलंदाज हर्षित राणाचाही यात समावेश नाही.
सोनी स्पोर्ट्स नेटवर्कने शेअर केलेल्या एका व्हिडिओमध्ये रहाणेने विश्वचषकासाठी आपले पाच वेगवान गोलंदाज निवडले आहेत. जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज आणि प्रसिद्ध कृष्णा यांच्यासोबतच त्याने डावखुरा वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंग आणि दिल्लीचा 'एक्सप्रेस पेसर' मयंक यादव यांना संघात स्थान दिले आहे.
गौतम गंभीरच्या मार्गदर्शनाखाली भारतीय संघात नियमित खेळणारा हर्षित राणा आणि नुकताच टी-२० संघात पुनरागमन करणारा अनुभवी भुवनेश्वर कुमार यांना रहाणेने वगळले आहे. विशेष म्हणजे, एकदिवसीय विश्वचषकाच्या इतिहासात भारतासाठी सर्वाधिक विकेट्स घेणाऱ्या मोहम्मद शमीलाही त्याने बाहेरचा रस्ता दाखवला आहे. टी-२० मध्ये भारताचा प्रमुख गोलंदाज असलेल्या अर्शदीप सिंगसोबतच, अद्याप एकदिवसीय क्रिकेटमध्ये पदार्पण न केलेल्या मयंक यादवला निवडून रहाणेने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला आहे. बुमराह, सिराज आणि प्रसिद्ध कृष्णा हे २०२३ च्या एकदिवसीय विश्वचषक संघाचाही भाग होते.
१२ संघांचा सहभाग असलेला हा एकदिवसीय विश्वचषक २ ऑक्टोबर ते २१ नोव्हेंबर २०२७ या कालावधीत खेळवला जाणार आहे. भारताचा पहिला सामना ७ ऑक्टोबरला गतविजेत्या ऑस्ट्रेलियाविरुद्ध होईल. त्यानंतर १० ऑक्टोबरला जोहान्सबर्ग येथे भारत आणि पाकिस्तान यांच्यात महामुकाबला रंगणार आहे.


