राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते झीशान सिद्दीकी यांना फोनवरून पुन्हा एकदा जीवे मारण्याची धमकी आली आहे. त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना याची माहिती दिली आहे. याआधी 'डी कंपनी'कडून १० कोटींची खंडणी मागणारी धमकी आली होती.
राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) नेते झीशान सिद्दीकी यांनी दावा केला आहे की, त्यांना फोनवरून जीवे मारण्याची धमकी मिळाली आहे. याबद्दल त्यांनी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांसह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाही माहिती दिली आहे.एएनआयशी बोलताना झीशान सिद्दीकी म्हणाले, "या धमकीच्या फोनबद्दल मी मुंबई पोलीस आयुक्त (CP) देवेन भारती आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना कळवलं आहे."
याआधीही आल्या होत्या धमक्या
झीशान यांना धमकी मिळण्याची ही पहिली वेळ नाही. गेल्या वर्षी २२ एप्रिल रोजी झीशान यांना ईमेलद्वारे जीवे मारण्याची धमकी आली होती. त्यांचे वडील आणि दिवंगत नेते बाबा सिद्दीकी यांची जशी हत्या झाली, तशीच तुझीही करू, असं या ईमेलमध्ये म्हटलं होतं. तसेच, त्यांच्याकडे १० कोटी रुपयांची खंडणी मागण्यात आली होती. दर सहा तासांनी असे ईमेल पाठवू, अशी धमकीही या ईमेलमध्ये देण्यात आली होती, असं पोलिसांनी सांगितलं. त्यावेळी एएनआयशी बोलताना झीशान यांनी हा धमकीचा ईमेल 'डी कंपनी'कडून आल्याचा आरोप केला होता. "मला डी कंपनीकडून धमकीचा मेल आला आहे. त्यांनी १० कोटींची खंडणी मागितली आहे. पोलिसांनी माझा जबाब नोंदवून घेतला आहे. या प्रकारामुळे आमचं कुटुंब खूप चिंतेत आहे," असं झीशान म्हणाले होते.
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरण
राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नेते बाबा सिद्दीकी यांची १२ ऑक्टोबर २०२४ रोजी मुंबईतील निर्मल नगर भागात, त्यांचा मुलगा झीशान सिद्दीकीच्या ऑफिसजवळ तीन हल्लेखोरांनी गोळ्या झाडून हत्या केली होती. या हत्येची जबाबदारी लॉरेन्स बिश्नोई गँगने स्वीकारली होती.
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणाच्या तपासात मुंबई पोलिसांना महत्त्वाची माहिती मिळाली आहे. या प्रकरणातील मुख्य संशयित आरोपी आकाशदीप गिल याला पंजाबमधून अटक करण्यात आली होती. त्याने गँगस्टर अनमोल बिश्नोईसह कटातील इतर प्रमुख सूत्रधारांशी बोलण्यासाठी एका मजुराच्या मोबाईल हॉटस्पॉटचा वापर केल्याचं तपासात समोर आलं आहे. गँगस्टर अनमोल बिश्नोईने रचलेल्या या हत्याकटात आकाशदीप गिल लॉजिस्टिक्स कोऑर्डिनेटर म्हणून काम करत होता, असं पोलिसांनी सांगितलं. (एएनआय)


