ऑफिसच्या कामाची ९ ते ५ ही वेळच सर्वोत्तम आहे का? एका कर्मचाऱ्याने सोशल मीडियावर केलेल्या पोस्टमुळे यावर जोरदार चर्चा सुरू झाली आहे. त्याच्या मते, दुपारी २ ते रात्री १० ची शिफ्ट जास्त सोयीची, उत्पादक आणि वैयक्तिक स्वातंत्र्यासाठी अधिक चांगली आहे.

मुंबई : नोकरी म्हटलं की सकाळी ९ ते संध्याकाळी ५ ही कामाची वेळ आपल्या डोळ्यासमोर येते. अनेक वर्षांपासून हेच समीकरण रुळलं आहे. पण एका सोशल मीडिया पोस्टमुळे या पारंपरिक वेळेपेक्षा दुसरी कोणती वेळ चांगली असू शकते का, यावर एक व्हायरल चर्चा सुरू झाली आहे. एका कर्मचाऱ्याने दावा केला आहे की, दुपारी २ ते रात्री १० ची शिफ्ट ९ ते ५ पेक्षा जास्त चांगली आहे. यामुळे कामही चांगलं होतं, सोयही होते आणि स्वतःसाठी वेळही मिळतो.

“दुपारी २ ते रात्री १० काम करणं हे ९ ते ५ पेक्षा खूपच भारी आहे,” अशा शीर्षकाखाली या कर्मचाऱ्याने आपली पोस्ट लिहिली आहे. त्याचं म्हणणं आहे की, या वेळेमुळे ९ ते ५ च्या शिफ्टनंतर येणारा थकवा आणि मरगळ टाळता येते.

तो म्हणतो, "कामानंतर तुम्ही थेट झोपू शकता आणि संध्याकाळी घरी परतल्यावर येणारी ती झोम्बीसारखी अवस्था टाळता येते. या थकव्यामुळे संध्याकाळी दुसरं कोणतंच काम होत नाही."

या कर्मचाऱ्याच्या मते, कामाला उशिरा सुरुवात केल्यामुळे सकाळचा पूर्ण वेळ स्वतःच्या कामांसाठी मिळतो. बँकेची कामं, अपॉइंटमेंट्स किंवा घरची कामं सकाळच्या वेळेत गर्दी नसताना आरामात करता येतात.

"या वेळेत बहुतेक सर्व ठिकाणं उघडी असतात, त्यामुळे कोणतीही अपॉइंटमेंट घेणं सोपं होतं. तुम्हाला कुठेही गर्दीचा किंवा ट्रॅफिकचा त्रास होत नाही. जिम रिकामे असतात, रस्त्यावर ट्रॅफिक नसतं आणि किराणा दुकानातही शांतता असते," असं त्याने म्हटलं आहे.

या कर्मचाऱ्याने असाही युक्तिवाद केला की या वेळापत्रकामुळे एक चांगलं आणि निवांत रुटीन सांभाळणं सोपं जातं.

"रात्रीची चांगली झोप झाल्यावर तुम्ही सकाळी जास्त उत्साही असता. घरची कामं पटापट होतात आणि कामावर जाण्यापूर्वी तुम्हाला आराम करायलाही वेळ मिळतो."

हा कर्मचारी स्पेनमधून अमेरिकेच्या टाइमझोननुसार रिमोट वर्क करतो. त्याच्या मते, या शिफ्टचा सर्वात मोठा फायदा म्हणजे काम संपल्याबरोबर लगेच झोपता येतं.

तो म्हणाला, "मी स्पेनमधून अमेरिकेच्या वेळेनुसार काम करतो आणि माझ्या कामाची हीच वेळ आहे, जी मला खूप आवडते. पण एक गोष्ट आहे, जर सगळेच या वेळेत काम करू लागले, तर याचे फायदे कमी होतील. पण काम संपवून थेट झोपायला मिळणं हे खरंच खूप भारी आहे."

मात्र, या पोस्टवर अनेकांनी टीकाही केली. काही युजर्सच्या मते, कामात सोय आणि उत्पादकता मिळत असली तरी, याचा परिणाम सामाजिक आणि कौटुंबिक जीवनावर होतो.

एका युजरने लिहिलं, "जर तुम्हाला मित्र किंवा कुटुंबासोबत वेळ घालवायचा नसेल, तर ही वेळ उत्तम आहे. जेव्हा तुम्ही मोकळे असता, तेव्हा ते कामावर असतात आणि जेव्हा ते मोकळे असतात, तेव्हा तुम्ही कामावर असता."

आणखी एकाने कुटुंबासोबत येणाऱ्या अडचणी सांगितल्या. तो म्हणाला, "मी सहमत आहे. जर तुम्ही सिंगल असाल तर हे ठीक आहे, पण लग्न झालं असेल आणि मुलं असतील तर खूप अवघड होतं. तुम्ही कामावरून घरी पोहोचेपर्यंत तुमची मुलं आणि जोडीदार झोपलेले असू शकतात."

तर काही जणांनी या उलट शिफ्टचं जोरदार समर्थन केलं. दुपारी ३ ते रात्री १२ काम करणाऱ्या एका युजरने सांगितलं की, ज्यांना सकाळी लवकर उठायला आवडत नाही, त्यांच्यासाठी ही वेळ आदर्श आहे.

तो म्हणाला, "ज्याला सकाळी लवकर उठायचा कंटाळा येतो, त्याच्यासाठी दुपारी ३ ते रात्री १२ ची वेळ उत्तम आहे. मी काम संपवून लगेच झोपतो, सकाळी ९ किंवा १० वाजता आरामात उठतो आणि मग माझ्याकडे स्वतःची कामं करायला भरपूर वेळ असतो."

एका युजरने मात्र एक संतुलित मत मांडलं. तो म्हणाला, "मी माझ्या विशीत असताना अशाच वेळेत काम केलं आहे. पोस्टमध्ये सांगितलेले फायदे खरे आहेत, पण त्याचे तोटेही होते. मुख्य तोटा म्हणजे माझा पार्टनर आणि बहुतेक मित्र या वेळेत काम करत नसल्यामुळे, आठवड्याच्या दिवसात होणारे गेट-टुगेदर, फॅमिली डिनर आणि संध्याकाळचे कार्यक्रम मला चुकावावे लागत होते."