शिवसेना (UBT) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पत्नी रश्मी आणि मुलगा आदित्य यांच्यासोबत मुंबईतील प्रसिद्ध गणेश गल्ली आणि लालबागच्या राजाचं दर्शन घेतलं. गणेश चतुर्थीच्या निमित्ताने त्यांनी बाप्पाची पूजा केली.
मुंबई : शिवसेना (UBT) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सोमवारी गणेश चतुर्थीनिमित्त मुंबईतील गणेश गल्लीला भेट दिली. यावेळी त्यांच्यासोबत पत्नी रश्मी ठाकरे आणि मुलगा-आमदार आदित्य ठाकरे हेही होते.
ठाकरे कुटुंबाकडून बाप्पाला साकडं
आदित्य ठाकरे यांनी X वर या भेटीचे फोटो शेअर केले आहेत. त्यांनी लिहिलं की, "लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या लालबागच्या राजाचं दर्शन पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे आणि आई रश्मी ठाकरे यांच्यासोबत घेतलं. विघ्नहर्त्या लालबागच्या राजाची कृपादृष्टी आम्हा सर्वांवर कायम राहो, हीच प्रार्थना."
मुख्यमंत्री फडणवीसांकडूनही शुभेच्छा
महाराष्ट्रासह देशभरात १० दिवसांचा गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा होत आहे. अनेक घरांमध्ये आणि सार्वजनिक मंडळांमध्ये गणपती बाप्पाचं आगमन झालं आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही या निमित्ताने शुभेच्छा दिल्या आहेत. देश, राज्य, नागरिक आणि शेतकऱ्यांसमोरील संकटं दूर व्हावीत, अशी प्रार्थना त्यांनी गणपती बाप्पाकडे केली.
फडणवीस यांनी पत्नी अमृता फडणवीस यांच्यासोबत त्यांच्या 'वर्षा' या शासकीय निवासस्थानी गणपती बाप्पाचं स्वागत केलं. "गणेश चतुर्थी आणि गणेशोत्सवानिमित्त जगभरातील सर्व गणेशभक्तांना माझ्या शुभेच्छा. सर्वांची दुःखं दूर करून संकटं नाहीशी करावीत, अशी मी विघ्नहर्त्या गणेशाकडे प्रार्थना करतो," असं फडणवीस म्हणाले.
ते पुढे म्हणाले, "आपला देश, राज्य, नागरिक आणि शेतकऱ्यांसमोरील सर्व आव्हानं पेलण्याची क्षमता, शक्ती आणि सामर्थ्य विघ्नहर्त्याकडून मिळो, हीच प्रार्थना."
अमृता फडणवीस म्हणाल्या की, "संपूर्ण महाराष्ट्रात मोठ्या उत्साहात बाप्पाचं स्वागत झालं आहे. मला खूप आनंद होत आहे. आज संपूर्ण महाराष्ट्रात आणि देशात बाप्पा आले आहेत. लोकांनी मोठ्या उत्साहाने त्यांचं स्वागत केलं आहे. पुढचे दहा दिवस संपूर्ण महाराष्ट्र उत्सव साजरा करेल."
मुंबईत उत्सवाचा जल्लोष
गणेशोत्सवाचं पारंपरिक केंद्र असलेल्या मुंबईत 'गणपती बाप्पा मोरया'च्या गजरात लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली आहे.


