- Home
- Mumbai
- थर्टी फर्स्टचं सेलिब्रेशन जोरात करा! रेल्वे धावणार रात्रभर; मध्य, पश्चिम आणि हार्बर रेल्वेचं 'स्पेशल' वेळापत्रक जाहीर
थर्टी फर्स्टचं सेलिब्रेशन जोरात करा! रेल्वे धावणार रात्रभर; मध्य, पश्चिम आणि हार्बर रेल्वेचं 'स्पेशल' वेळापत्रक जाहीर
Mumbai Special Local Trains For New Year : नवीन वर्ष २०२६ च्या स्वागतासाठी मध्य आणि पश्चिम रेल्वेने ३१ डिसेंबरच्या रात्री विशेष लोकल चालवण्याचा निर्णय घेतला आहे. या गाड्या सीएसएमटी, कल्याण, पनवेल, चर्चगेट आणि विरार दरम्यान धावतील.

थर्टी फर्स्टचं सेलिब्रेशन जोरात करा! रेल्वे धावणार रात्रभर
मुंबई : सरत्या वर्षाला निरोप आणि नवीन वर्ष २०२६ च्या स्वागतासाठी गेटवे ऑफ इंडिया, मरीन ड्राईव्ह आणि चौपाटीवर जमणाऱ्या लाखो मुंबईकरांसाठी रेल्वेने आनंदाची बातमी दिली आहे. थर्टी फर्स्टच्या रात्री सेलिब्रेशन आटोपून घरी परतताना प्रवाशांची गैरसोय होऊ नये, यासाठी मध्य आणि पश्चिम रेल्वेने 'विशेष लोकल' चालवण्याचा निर्णय घेतला आहे. ३१ डिसेंबर २०२५ च्या मध्यरात्री आणि १ जानेवारी २०२६ च्या पहाटे या गाड्या धावतील, ज्यामुळे मुंबईकरांना सुरक्षित प्रवासाचा पर्याय मिळणार आहे.
असे असेल विशेष लोकलचे वेळापत्रक
१. मध्य रेल्वे (Main Line)
मध्य रेल्वेवर सीएसएमटी आणि कल्याण दरम्यान विशेष फेऱ्या होतील.
CSMT ते कल्याण: मध्यरात्री १:३० वाजता सुटेल (कल्याणला पहाटे ३:०० वाजता पोहोचेल).
कल्याण ते CSMT: मध्यरात्री १:३० वाजता सुटेल (CSMT ला पहाटे ३:०० वाजता पोहोचेल).
२. हार्बर रेल्वे (Harbour Line)
नवी मुंबईकरांसाठी देखील विशेष सोय करण्यात आली आहे.
CSMT ते पनवेल: मध्यरात्री १:३० वाजता विशेष लोकल सुटेल.
पनवेल ते CSMT: मध्यरात्री १:३० वाजता सुटेल (CSMT ला पहाटे २:५० वाजता पोहोचेल).
३. पश्चिम रेल्वे (Western Line)
पश्चिम रेल्वेने प्रवाशांच्या सोयीसाठी तब्बल ८ विशेष लोकल चालवण्याचा निर्णय घेतला आहे.
चर्चगेट ते विरार: मध्यरात्री १:१५, २:००, २:३० आणि ३:२५ या वेळेत चर्चगेटवरून चार लोकल सुटतील.
विरार ते चर्चगेट: याच वेळेत विरारवरून चर्चगेटच्या दिशेने चार विशेष लोकल चालवण्यात येतील.
सुरक्षेसाठी चोख बंदोबस्त
नववर्षाच्या रात्री रेल्वे स्थानकांवर होणारी अलोट गर्दी लक्षात घेता, रेल्वे प्रशासनाने सुरक्षा व्यवस्थेत वाढ केली आहे. मुख्य स्थानकांवर अतिरिक्त पोलीस फौजफाटा आणि रेल्वे सुरक्षा दल (RPF) तैनात करण्यात येणार आहे, जेणेकरून प्रवाशांना कोणताही त्रास होणार नाही.
मुंबईकरांसाठी टीप
रात्री उशिरा प्रवास करताना रेल्वेच्या या अधिकृत वेळापत्रकाची नोंद ठेवा आणि गर्दी टाळण्यासाठी शक्य असल्यास डिजिटल तिकीट (UTS App) वापरा.

