निवडणूक प्रक्रियेतील गोंधळावरून ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या निलंबनाची मागणी केली आहे. निवडणूक आयोग गृह मंत्रालयाच्या दबावाखाली काम करत असल्याचा आरोप करत त्यांनी अमित शहांच्या राजीनाम्याचीही मागणी केली.
मुंबई : ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी बुधवारी मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्यावर तात्काळ कारवाई करत त्यांना निलंबित करण्याची मागणी केली. 'इंडियन एक्स्प्रेस'ने दिलेल्या एका वृत्तानुसार, स्पेशल समरी रिव्हिजन (SIR) प्रक्रियेतील त्रुटींवर दोन निवडणूक आयुक्तांनी आक्षेप घेतला होता. यावर संतप्त प्रतिक्रिया देताना राऊत म्हणाले की, भारतातील निवडणुका आता पारदर्शक राहिलेल्या नाहीत. त्यांनी निवडणूक आयोग थेट केंद्रीय गृह मंत्रालयाच्या इशाऱ्यावर काम करत असल्याचा गंभीर आरोप केला.
नवी दिल्लीत पत्रकारांशी बोलताना राऊत म्हणाले, "ज्ञानेश कुमार यांना निलंबित करून त्यांच्यावर कायदेशीर कारवाई झाली पाहिजे. या देशात निवडणुका म्हणजे आता फक्त एक फार्स उरला आहे. निवडणूक आयोग आता गृह मंत्रालयाच्या अंतर्गत येतो."
अमित शहांना मंत्रिमंडळातून काढा, राऊतांचा हल्लाबोल
संजय राऊत यांनी आपला हल्लाबोल आणखी तीव्र करत थेट केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यावर निशाणा साधला. त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे शहांना मंत्रिमंडळातून हाकलून देण्याची मागणी केली. "अमित शहा हे एक नंबरचे गुन्हेगार आहेत. जर पंतप्रधानांना देश वाचवायचा असेल, तर त्यांनी अमित शहांना मंत्रिमंडळातून बाहेर काढलं पाहिजे," असा घणाघात राऊत यांनी केला.
पुढे बोलताना राऊत यांनी एक अत्यंत वादग्रस्त विधानही केले. ते म्हणाले, "जर मोदीजींनी कारवाई केली नाही, तर मी तिन्ही संरक्षण दलांच्या प्रमुख असलेल्या राष्ट्रपतींना ज्ञानेश कुमार यांना हटवण्याची विनंती करेन. जर राष्ट्रपतींनीही काहीच पावले उचलली नाहीत, तर अशा हुकूमशहांपासून देशाला वाचवण्यासाठी लष्करप्रमुखांनी पुढे आले पाहिजे."
डीएमकेने उपस्थित केले भाजपच्या हेतूवर प्रश्न
'इंडियन एक्स्प्रेस'च्या वृत्तानुसार, निवडणूक आयुक्त सुखबीर सिंग संधू आणि विवेक जोशी यांनी गेल्या १० महिन्यांत त्यांच्या नकळत घेतलेल्या निर्णयांवर आणि काढलेल्या आदेशांवर किमान १४ वेळा आक्षेप नोंदवला आहे. यावरून डीएमकेचे प्रवक्ते टी. के. एस. इलंगोवन यांनी बुधवारी भाजपला धारेवर धरले. त्यांनी भाजप SIR प्रक्रियेसोबत खेळ करत असल्याचा आरोप केला.
"भाजप सरकार SIR च्या नावाखाली खेळ करत आहे. त्यांना या देशातून मुस्लिमांना बाहेर काढायचे आहे, हाच त्यांचा मुख्य हेतू आहे. त्यांना भारताला हिंदू राष्ट्र बनवायचे आहे, जे अशक्य आहे. कारण कायद्यानुसार लोकांनी मतदार म्हणून नोंदणी केली आहे आणि ते इथे अनेक वर्षांपासून राहत आहेत. सरकार SIR चा वापर करून त्यांची नावे मतदार यादीतून वगळू शकत नाही. सर्वात आश्चर्याची गोष्ट म्हणजे माजी उपराष्ट्रपती, माजी गृहमंत्री लालकृष्ण अडवाणी यांनीही या प्रकारावर पत्रे पाठवली आहेत. न्यायालयानेही यावर कडक ताशेरे ओढले आहेत. भाजपच्या या SIR प्रक्रियेवर न्यायालयाने जोरदार टीका केली आहे. निवडणूक आयोग आणि सरकारने याची दखल घेतली पाहिजे," असे इलंगोवन म्हणाले.
काँग्रेसही आक्रमक
या वृत्तानंतर राजकीय वातावरण आणखी तापण्याची शक्यता आहे. काँग्रेसचे खासदार अभिषेक मनू सिंघवी या मुद्द्यावर आज पत्रकार परिषद घेणार आहेत. काँग्रेस आणि लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनीही निवडणूक आयोग आणि SIR प्रक्रियेवर जोरदार हल्ला चढवला आहे. त्यांनी या प्रक्रियेमुळे मतदानाचा हक्क हिरावून घेतला जात असल्याचा आरोप केला आहे.


