शिवसेना (ठाकरे गट) खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस केंद्रात गेल्यास भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे महाराष्ट्राचे पुढील मुख्यमंत्री होऊ शकतात, असा दावा केला आहे. यामुळे राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू झाली आहे. 

मुंबई : शिवसेना (ठाकरे गट) खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या राजकीय भवितव्याबाबत मोठे वक्तव्य केले आहे. यामुळे राज्याच्या राजकारणात चर्चेला उधाण आणले आहे. फडणवीस भविष्यात केंद्रात गेल्यास भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे महाराष्ट्राचे पुढील मुख्यमंत्री होऊ शकतात, असा दावा राऊत यांनी केला. तसेच एकनाथ शिंदे पुन्हा मुख्यमंत्री होणार नसल्याचेही त्यांनी स्पष्टपणे म्हटले आहे.

Add Asianetnews Marathi as a Preferred SourcegooglePreferred

‘फडणवीसांनंतर बावनकुळे योग्य पर्याय’

संजय राऊत म्हणाले की, देवेंद्र फडणवीस यांच्यानंतर मुख्यमंत्रीपदासाठी चंद्रशेखर बावनकुळे हे योग्य नेते आहेत. सर्व पक्षांशी संवाद ठेवण्याची क्षमता आणि संघटनात्मक अनुभव यामुळे बावनकुळे यांचे नाव पुढे येऊ शकते. फडणवीस केंद्रात गेल्यास त्यांच्या शिफारसीनेच बावनकुळे यांची निवड होऊ शकते, असेही राऊत यांनी म्हटले.

 ‘एकनाथ शिंदे पुन्हा मुख्यमंत्री होणार नाहीत’

राज्यातील सत्तासमीकरणांवर भाष्य करताना राऊत यांनी एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या शक्यताही फेटाळल्या. शिंदे पुन्हा मुख्यमंत्री होणार नाहीत, असा दावा त्यांनी केला. संजय राऊतांच्या या वक्तव्यामुळे महायुतीतील राजकीय समीकरणांबाबत नव्या चर्चांना सुरुवात झाली आहे.

गिरीश महाजनांवरही साधला निशाणा

राऊत यांनी मंत्री गिरीश महाजन यांच्यावरही टीका केली. मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत त्यांचे नाव पुढे येण्याची शक्यता कमी आहे. याशिवाय गिरीश महाजन यांचा असल्याचे यांचा राजकीय रेकॉर्ड चांगला नसल्याचे वक्तव्य केले.

 फडणवीसांच्या राष्ट्रीय राजकारणातील भूमिकेवर भाष्य

देवेंद्र फडणवीस यांच्याबाबत सातत्याने केंद्रात जाण्याच्या चर्चा सुरू असल्याचे सांगत राऊत यांनी त्यांना शुभेच्छाही दिल्या. फडणवीस यांना राष्ट्रीय पातळीवर मोठी जबाबदारी मिळाल्यास महाराष्ट्रासाठी अभिमानाची बाब ठरेल. मात्र वर्ष 2029 नंतर देशातील राजकीय परिस्थिती बदलू शकते, असा दावाही राऊतांनी केला.

'ऑपरेशन टायगर'चीही चर्चा

यावेळी संजय राऊत यांनी शिंदे गटाच्या कथित 'ऑपरेशन टायगर' मोहिमेचाही उल्लेख केला. लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्यासोबत काही खासदारांच्या झालेल्या भेटीचे फोटो समोर आल्याचा दावा करत त्यांनी या घडामोडींवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले.

राजकीय चर्चांना उधाण

संजय राऊत यांच्या वक्तव्यानंतर महाराष्ट्रातील नेतृत्वबदल, भाजपमधील संभाव्य मुख्यमंत्रीपदाचे चेहरे आणि आगामी राजकीय समीकरणांबाबत चर्चांना वेग आला आहे. मात्र भाजप किंवा महायुतीतील नेत्यांकडून या दाव्यांवर अद्याप अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही.