तुमची-आमची लाडकी 'ओल्ड मंक' ही खरी 'रम' नाहीच, असा खळबळजनक दावा राष्ट्रीय अन्न सुरक्षा प्राधिकरणाने मुंबई उच्च न्यायालयात केला आहे. याआधी महाराष्ट्रात नियमांचं पालन न केल्यामुळे ओल्ड मंकच्या विक्रीवर बंदी घालण्यात आली होती.
मुंबई : आपल्या सगळ्यांची आवडती 'ओल्ड मंक' (Old Monk) ही खरंतर 'रम' (RUM) नाहीच! नुकताच राष्ट्रीय अन्न सुरक्षा प्राधिकरणाने (National Food Safety Authority) मुंबई उच्च न्यायालयात (Bombay High Court) हा खळबळजनक दावा केला आहे. त्यांनी कोर्टाला सांगितलं की, ओल्ड मंक बनवण्यासाठी न्यूट्रल स्पिरिटमध्ये रमचा फ्लेवर मिसळला जातो. यात खऱ्या रमचं प्रमाण पाच टक्क्यांपेक्षाही कमी असतं. त्यामुळे या पेयाला 'रम' म्हणता येणार नाही, असं प्राधिकरणाचं म्हणणं आहे.
'ओल्ड मंक' खरी RUM नाही!
प्राधिकरणाने स्पष्ट केलं आहे की, या पेयाला 'रम' म्हणण्याऐवजी 'रम फ्लेवर्ड स्पिरिट' (Rum Flavoured Spirit) म्हटलं पाहिजे. इतकंच नाही, तर ओल्ड मंकच्या बाटलीवरून 'सात वर्ष जुनी' (seven years aged) हे लेबल काढून टाकण्याचे निर्देशही देण्यात आल्याची माहिती आहे. विशेष म्हणजे, याआधी महाराष्ट्रात निर्मितीच्या नियमांचं पालन न केल्याचा आरोप ओल्ड मंकवर झाला होता. त्यानंतर राज्यात तिच्या विक्रीवर बंदी घालण्यात आली होती. याच खटल्याच्या सुनावणीदरम्यान अन्न सुरक्षा प्राधिकरणाने ही माहिती कोर्टात दिली.
मुंबई हायकोर्टात अन्न सुरक्षा प्राधिकरणाचा धक्कादायक दावा
देशभरातील मद्यप्रेमींमध्ये हा ब्रँड प्रचंड लोकप्रिय आहे. विशेषतः थंडीच्या दिवसात तर अनेक जण ओल्ड मंक पिणं पसंत करतात. मित्रांच्या मैफिलीत तर ओल्ड मंकला तोड नाही. पण याच लोकप्रिय ब्रँडबद्दल आता मोठा वाद निर्माण झाला आहे. कारण राष्ट्रीय अन्न सुरक्षा प्राधिकरणाच्या दाव्यानुसार, ओल्ड मंक ही खरी 'रम' नाहीच. न्यूट्रल स्पिरिटमध्ये केवळ फ्लेवर मिसळून ती तयार केली जाते आणि त्यात रमचं प्रमाण ५ टक्क्यांपेक्षाही कमी असतं.


