NCP Star Campaigners : महानगरपालिका निवडणुकांसाठी राष्ट्रवादी काँग्रेसने ४० स्टार प्रचारकांची यादी जाहीर केली असून, भाजपच्या विरोधाला न जुमानता नवाब मलिक आणि सना मलिक यांचा त्यात समावेश केला आहे.

NCP Star Campaigners : आगामी महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसने (अजित पवार गट) गुरुवारी राज्यभरातील प्रचारासाठी ४० स्टार प्रचारकांची यादी जाहीर केली आहे. या यादीत उपमुख्यमंत्री अजित पवार, पक्षाचे कार्याध्यक्ष प्रफुल पटेल आणि प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्यासह अनेक मंत्री व आमदारांचा समावेश असून, भाजपचा विरोध असतानाही नवाब मलिक यांना स्टार प्रचारक म्हणून स्थान देण्यात आले आहे.

अजित पवार, पटेल, तटकरे यांच्यावर प्रचाराची धुरा

राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रचाराची मुख्य जबाबदारी उपमुख्यमंत्री अजित पवार, पक्षाचे कार्याध्यक्ष प्रफुल पटेल आणि प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्यावर सोपवण्यात आली आहे. याशिवाय विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे तसेच राज्य मंत्रिमंडळातील नरहरी झिरवाळ, बाबासाहेब पाटील, मकरंद जाधव-पाटील, दत्तात्रय भरणे, अदिती तटकरे आणि इंद्रनील नाईक यांचाही स्टार प्रचारकांच्या यादीत समावेश करण्यात आला आहे.

नवाब मलिकांचा समावेश चर्चेत

महायुतीत राष्ट्रवादी काँग्रेसला स्थान नाकारण्यासाठी भाजपकडून नवाब मलिक यांच्या नावाचा मुद्दा उपस्थित केला जात आहे. मलिक यांच्या नेतृत्वाखाली मुंबईत राष्ट्रवादी निवडणूक लढवत असल्याने भाजपकडून त्यांचा विरोध केला जात आहे. मात्र, राष्ट्रवादी काँग्रेसने भाजपचा विरोध झुगारून स्टार प्रचारकांच्या यादीत नवाब मलिक यांचा समावेश कायम ठेवला आहे. यासोबतच त्यांच्या कन्या आणि आमदार सना मलिक यांनाही स्टार प्रचारक म्हणून जबाबदारी देण्यात आली आहे.

काही प्रमुख नेत्यांचा यादीत अभाव

प्रकृती अस्वास्थ्यामुळे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ प्रचारात सहभागी होणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे त्यांचे पुत्र आणि विधान परिषदेचे आमदार पंकज भुजबळ यांचाही या यादीत समावेश नाही. तसेच पक्षाचे मुख्य प्रवक्ते आनंद परांजपे यांनाही स्टार प्रचारकांच्या यादीत स्थान देण्यात आलेले नाही.

युतीबाबत निर्णय अद्याप प्रलंबित

राज्यातील कोणत्या महानगरपालिकेत कोणासोबत निवडणूक लढायची, याबाबत राष्ट्रवादी काँग्रेसकडून अद्याप अधिकृत निर्णय जाहीर करण्यात आलेला नाही. सध्या पक्षाकडून विविध पर्यायांची चाचपणी सुरू असून, त्याच पार्श्वभूमीवर स्टार प्रचारकांची यादी जाहीर करण्यात आल्याचे बोलले जात आहे.