नवी मुंबईतील कामोठे परिसरात शाळेच्या खासगी बसमध्ये तीन वर्षांच्या मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याच्या आरोपावरून 30 वर्षीय बसचालकाला अटक करण्यात आली आहे.

मुंबई : नवी मुंबईतील कामोठे परिसरात शाळेच्या विद्यार्थ्यांची वाहतूक करणाऱ्या खासगी बसमध्ये तीन वर्षांच्या चिमुकलीवर लैंगिक अत्याचार केल्याच्या धक्कादायक प्रकार समोर आला आहे. सदर प्रकरणातील आरोपावरून 30 वर्षीय बसचालकाला पोलिसांनी अटक केली आहे. इतर सर्व विद्यार्थी बसमधून उतरून गेल्यानंतर मुलगी बसमध्ये एकटी राहिल्याचा गैरफायदा घेत चालकाने तिच्यावर अत्याचार केल्याचा आरोप आहे. या प्रकरणी पोलिसांनी भारतीय न्याय संहिता आणि पोक्सो कायद्याअंतर्गत (POCSO Act) गुन्हा दाखल केला आहे.

सर्व विद्यार्थी उतरले, मुलगी बसमध्ये एकटी

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संबंधित चिमुकली नियमितपणे खासगी स्कूल बसने शाळेत ये-जा करत होती. बुधवारी दुपारी चालकाने कामोठे परिसरातील विविध ठिकाणांहून बालवाडी आणि प्राथमिक वर्गातील विद्यार्थ्यांना बसमध्ये घेतले. विद्यार्थ्यांना त्यांच्या नेहमीच्या थांब्यांवर सोडल्यानंतर अखेरीस तीन वर्षांची मुलगी बसमध्ये एकटी राहिली. याच परिस्थितीचा फायदा घेत चालकाने तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप पोलिसांनी केला आहे.

घरी आल्यानंतर चिमुकलीने सांगितली घटना

मुलगी घरी परतल्यानंतर तिने पोटात दुखत असल्याची तक्रार केली.आजीने विचारणा केल्यानंतर मुलीने बसमधील चालकाने आपल्यासोबत गैरवर्तन केल्याचे सांगितल्याचे पोलिसांनी नमूद केले. यानंतर आजीने प्रथम शाळेच्या प्रशासनाला याबाबत माहिती दिली आणि त्यानंतर पोलिसांकडे तक्रार केली.

वैद्यकीय तपासणीनंतर गुन्हा दाखल

पोलिसांनी मुलीची वैद्यकीय तपासणी केली. तपासणीमध्ये लैंगिक अत्याचार झाल्याचे निष्पन्न झाले. यानंतर चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. अल्पवयीन मुलीवरील लैंगिक अत्याचाराच्या आरोपामुळे चालकाला अटक करण्यात आली आहे.

शाळा व्यवस्थापनाचीही चौकशी होणार

या प्रकरणाच्या तपासादरम्यान शाळा व्यवस्थापनातील संबंधित अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे जबाबही नोंदवले जाणार आहेत. विद्यार्थ्यांच्या वाहतुकीसाठी नियुक्त करण्यात आलेल्या खासगी बसची व्यवस्था, चालकाची नियुक्ती आणि विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसंदर्भातील नियमांचे पालन याबाबतही तपास केला जाण्याची शक्यता आहे.अटक करण्यात आलेल्या आरोपीला गुरुवारी पनवेल येथील न्यायालयात हजर करण्यात आले. सदर प्रकरणात न्यायालयाने बस चालकाला शनिवारपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. आता पोलिसांकडून या प्रकरणाचा पुढील तपास सुरू करण्यात आला आहे.