गेल्या आठवड्यापासून टेस्लाच्या X (पूर्वीचे ट्विटर) वरील इंडिया अकाऊंटवर "Coming Soon" अशी उत्सुकता वाढवणारी पोस्ट टाकण्यात आली होती. त्यानंतर ग्राहकांमध्ये उत्सुकता वाढली होती. आज टेस्लाच्या शोरूमच्या उद्घटनानंतर ही प्रतीक्षा संपली आहे.
मुंबई - जगभरातील आघाडीची इलेक्ट्रिक वाहन निर्माती कंपनी टेस्लाने आज मंगळवारी अधिकृतपणे भारतीय बाजारपेठेत पाऊल ठेवले आहे. मुंबईतील बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्स (BKC) येथील मेकर मॅक्सिटी मॉलमध्ये कंपनीचे पहिले भव्य शोरूम सुरु झाले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या शोरुमचे उद्गाटन करण्यात आले आहे.
गेल्या आठवड्यापासून टेस्लाच्या X (पूर्वीचे ट्विटर) वरील भारत केंद्रित खात्यावर "Coming Soon" अशी उत्सुकता वाढवणारी पोस्ट टाकण्यात आली होती. त्यानंतर ग्राहकांमध्ये उत्सुकता वाढली होती. आज टेस्लाच्या शोरूमच्या उद्घटनानंतर ही प्रतीक्षा संपली आहे.
सध्या केवळ आयातीत गाड्यांची विक्री
टेस्लाने जरी भारतात अधिकृतपणे एंट्री केली असली तरी सध्या केवळ आयातीत गाड्या विक्रीसाठी उपलब्ध असतील. कंपनीकडून सध्या कोणताही स्थानिक उत्पादन प्रकल्प सुरु करण्याची योजना नाही, अशी माहिती केंद्रीय अवजड उद्योग मंत्री एच. डी. कुमारस्वामी यांनी जून महिन्यात दिली होती. त्यांनी स्पष्टपणे सांगितले, “टेस्ला भारतात केवळ गाड्या विकण्याच्या उद्देशाने येत आहे. उत्पादन प्रकल्पाबाबत अजून कोणतीही ठोस हालचाल झालेली नाही.”
नवीन ईव्ही धोरणामुळे भारतीय बाजारपेठेत रस
टेस्लाच्या भारत प्रवेशामागे केंद्र सरकारचे नवीन इलेक्ट्रिक वाहन धोरण एक महत्त्वाचा घटक ठरले आहे. या धोरणाअंतर्गत भारतात इलेक्ट्रिक वाहनांचे उत्पादन किंवा विक्री करण्यासाठी आयात शुल्कात सवलती, तसेच प्रोत्साहन अनुदाने देण्यात येणार आहेत.
या पार्श्वभूमीवर यावर्षीच्या सुरुवातीस पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि टेस्ला सीईओ एलॉन मस्क यांच्यात दूरध्वनीवरून संवादही झाला होता. त्यानंतर टेस्लाच्या भारतातील धोरणांबाबत अनेक तर्क-वितर्कांना उधाण आले होते.
भारतातील ‘टेस्ला स्ट्रॅटेजी’ अजूनही गुलदस्त्यात
टेस्लाकडून अद्याप भारतातील दीर्घकालीन योजना किंवा मॉडेल्ससंदर्भात कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. मात्र, कंपनीने स्थानिक स्तरावर भरती प्रक्रिया सुरू केली आहे. त्यामुळे भारतात आपली पकड मजबूत करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे संकेत मिळतात.
मुंबईतील हे पहिले शोरूम केवळ विक्री केंद्र नसून, भारतातील ग्राहकांचा प्रतिसाद आणि मागणीचा अभ्यास करण्यासाठी एक टेस्टिंग ग्राउंड म्हणूनही कार्य करणार आहे.
शोरूममध्ये उपलब्ध असलेल्या मॉडेल्स
टेस्लाच्या या शोकेसमध्ये Model 3, Model Y, Model S आणि Model X या प्रीमियम इलेक्ट्रिक गाड्यांचे प्रदर्शन करण्यात आले आहे. सध्या या गाड्या युएस किंवा अन्य टेस्ला उत्पादन केंद्रातून आयात करून विक्रीसाठी ठेवण्यात येणार आहेत. तसेच, या गाड्यांची किंमत आयात शुल्क, वाहतूक व करामुळे भारतात तुलनेने जास्त असणार आहे. सुरुवातीला ही गाड्या केवळ हाय-एंड मार्केट लक्षात घेऊन विकल्या जाणार आहेत.
भारतात EV क्षेत्रात वाढती स्पर्धा
भारतीय बाजारपेठेत आता टेस्लाच्या आगमनामुळे Tata Motors, Mahindra, BYD, Hyundai, Kia आणि MG Motor यांच्यासारख्या आधीपासूनच कार्यरत असलेल्या कंपन्यांमध्ये स्पर्धा वाढणार आहे. सरकारच्या 2025 EV टार्गेट्स, राज्य सरकारांचे प्रोत्साहन आणि पर्यावरणपूरक तंत्रज्ञानाच्या गरजेमुळे भारत EV क्षेत्रासाठी एक महत्त्वपूर्ण बाजार बनत आहे.
टेस्लाची भारतातील भविष्यातील दिशा
टेस्लाने जरी सध्या उत्पादन करण्यात रस दाखवला नसला तरी, जर भारतात मागणी वाढली आणि सरकारकडून अधिक प्रोत्साहन मिळाले, तर भविष्यात स्थानिक उत्पादन प्रकल्प, बॅटरी गिगाफॅक्टरी किंवा R&D सेंटर सुरू करण्याची शक्यता नाकारता येत नाही.
टेस्लाच्या आजच्या पदार्पणामुळे भारतात EV क्रांतीला नवा वेग मिळण्याची शक्यता आहे. ग्राहकांसाठी ही एक मोठी संधी असून जागतिक दर्जाचे इलेक्ट्रिक वाहन आपल्या देशात उपलब्ध होणार आहे. पुढील काही महिन्यांत टेस्लाच्या इतर शहरांतील शोरूम आणि संभाव्य उत्पादन प्रकल्प याविषयी अधिक माहिती मिळण्याची शक्यता आहे.

