मुंबईतील दहीहंडी उत्सवादरम्यान ३७६ गोविंदा जखमी झाले. तसेच दहीहंडीची दोरी बांधलेला वीटांचा खांब कोसळून सात वर्षांच्या मुलाचा मृत्यू झाल्याची दुर्घटना घडली आहे.
मुंबई : मुंबईत शनिवारी दहीहंडी उत्सवाला गालबोट लागले. मालवणीतील चिकूवाडी परिसरात वीटांचा खांब कोसळून सात वर्षांच्या मुलाचा मृत्यू झाला. दरम्यान, मुंबईतील विविध भागांत दहीहंडी फोडताना झालेल्या अपघातांमध्ये तब्बल ३७६ गोविंदा जखमी झाल्याची माहिती मुंबई महापालिकेने दिली आहे.
मालवणीत वीटांचा खांब कोसळला
चिकूवाडी, मालवणी येथील एकता वेल्फेअर सोसायटीमध्ये शनिवारी दुपारी काही मुले स्वतःहून दहीहंडी साजरी करत होती. त्यांनी एका बाजूला झाडाला, तर दुसऱ्या बाजूला घराच्या वीटांच्या खांबाला दहीहंडीची दोरी बांधली होती. हंडी फोडताना निर्माण झालेल्या दबावामुळे वीटांचा खांब कोसळला आणि त्याखाली सात वर्षांचा मुलगा दबला गेला. या दुर्घटनेत त्याचा मृत्यू झाला.
मुंबईत ३७६ गोविंदा जखमी
दहीहंडी उत्सवादरम्यान मानवी मनोरे रचताना आणि हंडी फोडताना मुंबईत एकूण ३७६ गोविंदा जखमी झाले. यापैकी सर्वाधिक १८३ जखमींची नोंद मुंबई शहरातील रुग्णालयांमध्ये झाली. पश्चिम उपनगरांत १२६, तर पूर्व उपनगरांत ६२ जखमींवर उपचार करण्यात आले.
२८६ जणांना उपचारानंतर डिस्चार्ज
महापालिकेच्या माहितीनुसार, जखमींपैकी ५३ जण रुग्णालयात दाखल होते, तर ३७ जणांवर उपचार सुरू होते. दरम्यान, २८६ जखमी गोविंदांना उपचारानंतर घरी सोडण्यात आले. केईएम रुग्णालयात सर्वाधिक जखमी झाल्याची माहिती आहे.
मुंबईतील रुग्णालयांमध्येही मोठ्या संख्येने गोविंदांवर उपचार
- केईएम रुग्णालय, परळ – ७६ जखमी
- एचबीटी ट्रॉमा केअर रुग्णालय, जोगेश्वरी – ३४
- राजावाडी रुग्णालय, घाटकोपर – ३३
- व्ही. देसाई रुग्णालय, विक्रोळी – ३३
- नायर रुग्णालय, मुंबई सेंट्रल – ३२
- सायन रुग्णालय – १८
- बीडीबीए रुग्णालय, गोवंडी – १८
महाराष्ट्रभर दहीहंडीचा उत्साह
भगवान श्रीकृष्णाच्या जन्माचा उत्सव म्हणून साजरा केला जाणारा दहीहंडी उत्सव शनिवारी महाराष्ट्रभर उत्साहात पार पडला. गोविंदा पथकांकडून मानवी मनोरे रचून उंचावर बांधलेली दहीहंडी फोडण्यात आली. मात्र, मुंबईतील अपघातांमुळे उत्सवाच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.


