मुंबईत एका ब्रोकरने साडेसहा कोटींच्या आलिशान फ्लॅटची जाहिरात केली, पण अट घातली की घर फक्त शाकाहारी लोकांनाच मिळेल. या अटीमुळे सोशल मीडियावर मोठा वाद पेटला असून, याला 'फूड अपारथेड' म्हणत लोक टीका करत आहेत.

मुंबईतल्या एका रिअल इस्टेट ब्रोकरची जाहिरात सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरली आहे. या जाहिरातीत चक्क मांसाहारी लोकांना साडेसहा कोटी रुपयांचा आलिशान फ्लॅट विकण्यास नकार देण्यात आला आहे. हा व्हायरल व्हिडिओ समोर आल्यानंतर लोकांमध्ये प्रचंड संताप व्यक्त होत असून, मुंबईतील घरांच्या खरेदी-विक्रीत होणाऱ्या भेदभावाचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, हा व्हिडिओ दक्षिण मुंबईतील तारदेव परिसरातील एका नवीन उंच इमारतीमधील फ्लॅटचा आहे. यात एक ब्रोकर फ्लॅटची माहिती देताना सांगतो की, ही इमारत फक्त शाकाहारी खरेदीदारांसाठी आहे. जे लोक मांसाहार करतात, त्यांना इथे घर खरेदी करता येणार नाही, असं तो स्पष्टपणे सांगताना दिसतोय.

इथे पाहा तो व्हायरल व्हिडिओ:

View post on Instagram

या अटीमुळे सोशल मीडियावर लगेचच तीव्र प्रतिक्रिया उमटल्या. एखाद्या व्यक्तीच्या खाण्यापिण्याच्या सवयींवरून त्याला घर खरेदी करण्यापासून कसं रोखलं जाऊ शकतं, असा सवाल नेटकऱ्यांनी विचारला आहे. काहींनी या प्रकाराला 'फूड अपारथेड' (food apartheid) म्हणजे 'खाण्यावरून होणारा भेदाभेद' असं म्हटलं आहे. तर काहींच्या मते, मुंबईतील काही सोसायट्यांमध्ये अशा प्रकारच्या अटी अनेक वर्षांपासून आहेत.

या प्रकरणामुळे मुंबईतील घर खरेदी-विक्रीतील भेदभावावर पुन्हा एकदा मोठी चर्चा सुरू झाली आहे. गेल्या अनेक वर्षांपासून खाण्याच्या सवयी, धर्म, वैवाहिक स्थिती आणि जात यांसारख्या कारणांवरून लोकांना घर नाकारल्याच्या घटना समोर आल्या आहेत. विशेषतः मांसाहारी लोकांना लक्ष्य करण्याच्या घटनांवरून शहरात अनेकदा वाद झाले आहेत.

रिपोर्ट्सनुसार, या व्हायरल व्हिडिओमधील फ्लॅटची किंमत सुमारे ६.५ कोटी रुपये आहे. एवढी मोठी रक्कम मोजून घर घेतल्यानंतरही स्वतःच्या घरात काय खावं यावर बंधनं कशी असू शकतात, असा प्रश्न अनेकजण विचारत आहेत. यामुळे व्यक्ती स्वातंत्र्याच्या अधिकारावर गदा येत असल्याचं मत टीकाकारांनी मांडलं आहे.

मात्र, यावर एक दुसरा मतप्रवाहही आहे. काही लोकांनी शाकाहारी-सोसायटीच्या नियमांचं समर्थन केलं आहे. त्यांच्या मते, हा सामूहिक जीवनशैली आणि आवडीनिवडीचा भाग आहे. पण, अनेकांनी याला कडाडून विरोध करत, खाण्यापिण्याच्या सवयींवरून कोणालाही घर नाकारता कामा नये, असं म्हटलं आहे.

या व्हायरल जाहिरातीमुळे आता सोसायट्या आणि घरमालक खरेदीदारांवर कोणत्या प्रकारच्या अटी लादू शकतात, यावर पुन्हा एकदा वाद सुरू झाला आहे.