मुंबईतील एका इमारतीत डोमिनोज पिझ्झा डिलिव्हरी बॉयला मराठी न येत असल्याने पैसे नाकारण्यात आले. ग्राहकांनी पिझ्झा स्वतःकडे ठेवला आणि डिलिव्हरी बॉयला पैसे न देता परत पाठवले. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

मुंबई: मुंबईत पुन्हा एकदा भाषेच्या वादाने उग्र रूप घेतले आहे. भांडुपमधील साई राधे नावाच्या इमारतीत एका डोमिनोज पिझ्झा डिलिव्हरी बॉयला केवळ मराठी न येत असल्याने पैसे नाकारण्यात आले. ‘मराठी बोललास तरच पैसे मिळतील’ असे सांगत एका जोडप्याने या तरुणाला न बोलता परत पाठवले.

Add Asianetnews Marathi as a Preferred SourcegooglePreferred

रोहित असे या डिलिव्हरी बॉयचे नाव असून, त्याने संपूर्ण प्रसंग आपल्या मोबाईलमध्ये रेकॉर्ड केला आहे. या व्हिडिओमध्ये ग्राहक रोहितला मराठीत बोलण्यासाठी दबाव टाकताना दिसत आहेत. आश्चर्याची गोष्ट म्हणजे, पैसे दिले नाहीत आणि पिझ्झाही स्वतःकडेच ठेवला. रोहित व्हिडिओत म्हणताना दिसतो. "मराठी येत नाही म्हणून पैसे नाकारले जात आहेत. अशी जबरदस्ती योग्य आहे का?" त्यावर महिला म्हणते “इथे असेच आहे!” रोहित त्यानंतर सांगतो. "जर मराठी येत नसेल, तर ऑर्डरच का केली? पैसे नकोत, पिझ्झा ही परत घेणार नाही?"

पुढे महिला डिलिव्हरी बॉयला व्हिडिओ न काढण्यास सांगते, तर ती स्वतःच रेकॉर्डिंग सुरू करते. त्यानंतर जोडपं पिझ्झा खराब असल्याचा मुद्दा काढते, पण रोहित म्हणतो "दाखवा मग, खराब आहे का?"

या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. अनेकांनी यावर प्रतिक्रिया देताना भाषा महत्त्वाची असली तरी अशा प्रकारची जबरदस्ती अन्यायकारक असल्याचं मत व्यक्त केलं आहे. डोमिनोज कंपनीने या प्रकरणावर अद्याप कोणताही अधिकृत प्रतिसाद दिलेला नाही.