महायुतीच्या 6 जागा विधान परिषदेसाठी बिनविरोध झाल्या आहेत मात्र नाशिक आणि जळगावमध्ये महायुतीला बंडखोरीने ग्रासले आहे. अखेर या 2 जागांवर भाजपाचा विजय होतो, की शिवसेनाचा याकडे सर्वांचं लक्ष लागून आहे. 

मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणात हालचालींना वेग आला आहे. विधान परिषदेच्या 17 जागांसाठी होणाऱ्या निवडणुकीपैकी 6 जागांवर सत्ताधारी महायुतीचे उमेदवार बिनविरोध निवडून येणे निश्चित झाले आहे. मात्र, नाशिक आणि जळगाव या दोन जागांवर महायुतीला स्वतःच्याच बंडखोरांचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे आता 18 जून रोजी होणाऱ्या मतदानाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. उर्वरित 11 जागांसाठी मतदान होणार आहे. दुसरीकडे, महाविकास आघाडीला (MVA) निवडणुकीपूर्वीच मोठा धक्का बसला आहे.

Add Asianetnews Marathi as a Preferred SourcegooglePreferred

आघाडीला आपल्या 15 उमेदवारांनाही शेवटपर्यंत मैदानात टिकवून ठेवता आले नाही. त्यांच्या 6 उमेदवारांनी उमेदवारी अर्ज मागे घेतले. यावरून राजकीय वातावरण तापले असून, महाविकास आघाडीच्या नेत्यांनी महायुतीवर जोरदार टीका केली आहे.

शिवसेना (ठाकरे गट) नेते संजय राऊत यांनी, "ही आता सामान्य जनतेची निवडणूक राहिलेली नाही, तर पैशांचा बाजार बनली आहे," अशी टीका केली. तर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी महायुतीवर "पैसा फेका, तमाशा पाहा" असे राजकारण केल्याचा आरोप केला.

उर्वरित 11 जागांवर आता लढत होणार असली तरी संख्याबळाच्या दृष्टीने महायुतीचे पारडे जड मानले जात आहे.

बिनविरोध विजयी उमेदवार

1) ठाणे

विजयी : रवींद्र फाटक (शिंदे शिवसेना)

माघार: अभिजित पवार (राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार)

2) रायगड-रत्नागिरी-सिंधुदुर्ग

विजयी : अनिकेत तटकरे (अजित पवार गट राष्ट्रवादी काँग्रेस)

माघार: बाळ माने (ठाकरे गट शिवसेना)

3) पुणे

विजयी : विक्रम काकडे (अजित पवार गट राष्ट्रवादी काँग्रेस)

माघार: श्रीकांत पाटील (राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार) आणि बंडखोर सुनील टिंगरे

4) चंद्रपूर-वर्धा-गडचिरोली

विजयी : अरुण लखानी (भाजप)

माघार: शैलेश अग्रवाल (काँग्रेस)

5) यवतमाळ

विजयी : दुष्यंत चतुर्वेदी (शिंदे शिवसेना)

माघार: साहेबराव कांबळे (काँग्रेस)

6) अहिल्यानगर

विजयी : प्राजक्त तनपुरे (भाजप)

माघार: करण ससाणे (काँग्रेस)

जळगाव आणि नाशिकमध्ये महायुतीच्या नेत्यांमध्ये समन्वय दिसून आला नाही, नेत्यांमध्येही याविषयी संवाद साधताना आणि समजदारी दाखवता आलेली नाही, म्हणून येत्या काळात महायुतीत संघर्षाची सुरुवात होण्याची चिन्ह आहेत.