नीट पेपरफुटीचे प्रकरण सध्या देशात गाजत आहे. याच पार्श्वभूमीवर राज्यात ठिकठिकाणी आंदोलने करण्यात येत आहेत. नाशिक, पुणे, नागपूरसह मुंबईतील दादर येथे आंदोलनाची हाक दिली होती. याच वेळचा एक व्हिडीओ समोर आला आहे.
मुंबई : देशभरात सध्या नेट पेपरफुटी प्रकरणावरुन ठिकठिकाणी आंदोलने पेटली आहेत. याचेच पडसाद महाराष्ट्रातही उमटले आहेत. नुकत्याच मुंबईतील दादर येथे नीट पेपरफुटी विरोधात आंदोलनाची हाक देण्यात आली होती. यामध्ये शेकडोच्या संख्येने विद्यार्थी आंदोलनात सहभागी झाले होते. याच पार्श्वभूमीवर आंदोलनातील एका महिलेचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियात तुफान व्हायरल होत आहे.
नक्की काय म्हणाली महिला?
महिला आपल्या मुलासोबत आंदोलनात सहभागी होण्यासाठी आली होती. यावेळी पोलिसांनी तिच्यासह मुलाला पांगवण्याचा प्रयत्न केला. यावर महिलेने संताप व्यक्त केला. तिने म्हटले की, "प्रिव्हेन्शनच्या नावाखाली आम्हाला अटक केली जात आहे, हे आम्हाला मान्य नाही", "आम्ही कोणताही कायदा मोडलेला नाही, तरीही आम्हाला येथे उभं राहू दिलं जात नाही,". सदर घटना चैत्यभूमीच्या परिसरात घडली आहे.
'संरक्षण हवं तर सत्ताधाऱ्यांपासून द्या'
महिलेने पुढे म्हटले की, "आम्हाला पोलिसांपासून संरक्षण नको आहे. संरक्षण द्यायचं असेल तर पंतप्रधान, मुख्यमंत्री आणि शिक्षण मंत्र्यांच्या धोरणांपासून द्या," असे वक्तव्य केले. तसेच, हक्कांसाठी आवाज उठवणाऱ्यांना रोखले जात असल्याचा आरोपही केला. यानंतर महिलेला पत्रकारांसोबत संवाद साधू न देता बाजूला घेण्यात आले. यानंतर तिला तिच्या मुलासह गाडीत बसवून नेले.
आंदोलनकर्त्यांकडून जोरदार घोषणाबाजी
या वेळी "इंकलाब जिंदाबाद", "विद्यार्थी एकता जिंदाबाद" अशा घोषणा दिल्या गेल्या. काही आंदोलनकर्त्यांनी अटकेला विरोध करत "आम्ही गुंड नाही, आम्ही आमच्या हक्कांसाठी लढत आहोत," अशी भूमिका मांडली.
कालही निघाला मोर्चा
नीट पेपरफुटी प्रकरणात रविवारी (19 जुलै) शिवाजी पार्कात आंदोलन करण्यात आले. यावेळीही अनेक विद्यार्थ्यांनी आंदोलनात सहभाग घेतला. आंदोलन करताना ‘आझादी’, ‘हमारी मांगे पुरी करो’ अशा घोषणा देण्यात येत होत्या. याशिवाय कालही दादरमध्ये पुन्हा एकदा विद्यार्थ्यांकडून आंदोलन करण्यात आले.



