मध्य रेल्वेवरील वाढत्या गर्दीच्या पार्श्वभूमीवर एक मोठा निर्णय घेण्यात आला आहे. आजपासून 12 डब्यांच्या लोकलसाठी आणखी काही डबे जोडण्यात आले आहे. यामुळे प्रवाशांना दिलासा मिळणार आहे.
मुंबई : दररोज लोकलमधील प्रचंड गर्दीचा सामना करणाऱ्या मध्य रेल्वे मार्गावरील प्रवाशांसाठी दिलासादायक बातमी आहे. प्रवाशांची वाढती संख्या आणि गर्दी लक्षात घेऊन मध्य रेल्वेने एक मोठा निर्णय घेतला आहे. लोकलच्या 12 डब्यांचे 15 डब्यांमध्ये रूपांतर करण्याचा निर्णय घेतला आहे. हा बदल आजपासूनच लागू करण्यात आला आहे.
कोणत्या मार्गांवर धावणार 15 डब्यांच्या लोकल
नव्या निर्णयानुसार, सीएसएमटी ते अंबरनाथ, कल्याण, बदलापूर आणि कर्जत या मार्गांवरील काही लोकल फेऱ्यांमध्ये तीन अतिरिक्त डबे जोडण्यात आले आहेत. त्यामुळे या गाड्यांची प्रवासी क्षमता वाढणार आहे.
15 डब्यांच्या फेऱ्यांची संख्या 32 वर
मध्य रेल्वेवर 15 डब्यांच्या लोकल सेवा प्रथम ऑक्टोबर 2020 मध्ये सुरू करण्यात आल्या होत्या. त्यावेळी अशा 16 फेऱ्या होत्या. त्यानंतर वर्ष 2021 मध्ये आणखी सहा फेऱ्यांची भर पडली. आता नव्याने 10 फेऱ्या वाढवल्यानंतर 15 डब्यांच्या लोकल फेऱ्यांची एकूण संख्या 32 वर पोहोचली आहे.
प्रवासी संघटनांची मागणी अखेर मान्य
मध्य रेल्वेवरील वाढती गर्दी पाहता 15 डब्यांच्या लोकलची संख्या वाढवावी, अशी मागणी प्रवासी संघटनांकडून करण्यात येत होती. कर्जत, बदलापूर आणि अंबरनाथ मार्गांवर सकाळ-संध्याकाळ होणारी गर्दी लक्षात घेता रेल्वे प्रशासनाने हा निर्णय घेतल्याचे मानले जात आहे.
एकूण लोकल फेऱ्यांमध्ये वाढ नाही
15 डब्यांच्या लोकलची संख्या वाढविण्यात आली आहे. मात्र उपनगरीय रेल्वेच्या एकूण फेऱ्यांमध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही. मध्य रेल्वेच्या 9,840 लोकल फेऱ्या पूर्वीप्रमाणेच सुरू राहणार आहेत. केवळ काही विशेष 12 डब्यांच्या गाड्यांचे 15 डब्यांमध्ये रूपांतर करण्यात आले आहे.
गर्दी कमी होण्याची अपेक्षा
मध्य रेल्वेच्या या निर्णयामुळे लाखो प्रवाशांना दिलासा मिळण्याची शक्यता आहे. याशिवाय प्रवास अधिक सुलभ होण्याची अपेक्षा आहे.
येथे पाहा वेळापत्रक
डाऊन मार्गावरील नवीन 15 डब्यांच्या फेऱ्या
- सीएसएमटी – अंबरनाथ : सकाळी 9.15
- सीएसएमटी – कल्याण : दुपारी 12.25
- सीएसएमटी – बदलापूर : दुपारी 3.03
- सीएसएमटी – कर्जत : सायंकाळी 6.29
- सीएसएमटी – अंबरनाथ (स्लो लोकलचे फास्टमध्ये रूपांतर) : रात्री 11.06
अप मार्गावरील नवीन 15 डब्यांच्या फेऱ्या
- अंबरनाथ – सीएसएमटी : सकाळी 7.41
- अंबरनाथ – सीएसएमटी (स्लो लोकलचे फास्टमध्ये रूपांतर) : सकाळी 10.03
- कल्याण – सीएसएमटी : दुपारी 1.36
- बदलापूर – सीएसएमटी : सायंकाळी 4.47
- कर्जत – सीएसएमटी : रात्री 8.38


