BMC Election Results 2026 : बीएमसी निवडणूक २०२६ चा पहिला निकाल जाहीर झाला असून, धारावीतील प्रभाग क्रमांक १८३ मधून काँग्रेसच्या आशा काळे विजयी झाल्या आहेत. शिवसेना-भाजप महायुतीच्या वैशाली शेवाळे यांचा पराभव झालाय.

BMC Election Results 2026 : मुंबई महापालिका निवडणुकीच्या मतमोजणीला सुरुवात झाली असून, सुरुवातीचे कल हळूहळू समोर येऊ लागले आहेत. शिवसेना-भाजप महायुती आणि ठाकरे बंधू यांच्या गटांमध्ये चुरशीची लढत सुरू असतानाच बीएमसी निवडणुकीचा पहिला अधिकृत निकाल हाती आला आहे. धारावी येथील प्रभाग क्रमांक १८३ मधून काँग्रेसच्या तिकिटावर आशा काळे यांनी विजय मिळवला असून, हा निकाल काँग्रेससाठी दिलासादायक ठरला आहे.

धारावी प्रभागात काँग्रेसचा विजय

प्रभाग क्रमांक १८३ धारावी येथून काँग्रेस उमेदवार आशा काळे यांनी प्रतिस्पर्ध्यांवर मात करत विजय संपादन केला. या लढतीत शिवसेना-भाजप महायुतीकडून शिवसेनेच्या तिकिटावर लढणाऱ्या वैशाली शेवाळे यांना पराभव स्वीकारावा लागला. वैशाली शेवाळे या माजी खासदार राहुल शेवाळे यांच्या वहिनी आहेत.

कांटे की टक्कर असलेल्या लढतीत काँग्रेस सरशी

या प्रभागात लढत अत्यंत चुरशीची होती. ठाकरे बंधूंकडून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पारुबाई कटके, राष्ट्रवादी काँग्रेसकडून राजश्री खाडे तसेच बहुजन समाज पार्टीकडून मंगल भगत या उमेदवारही रिंगणात होत्या. मात्र अखेर काँग्रेसच्या आशा काळे यांनी बाजी मारली.

धारावी काँग्रेसचा बालेकिल्ला

धारावी हा काँग्रेसचा बालेकिल्ला मानला जातो. वर्षा गायकवाड आणि ज्योती गायकवाड या भगिनींचे या भागात प्रभावी वर्चस्व आहे. त्यामुळे काँग्रेसच्या प्राबल्य असलेल्या या प्रभागात आशा काळेंचा विजय अपेक्षित मानला जात आहे.

YouTube video player