BJP candidate from Dahisar Tejaswi Ghosalkar won : मुंबई महानगरपालिका निवडणुकीत, भाजपतर्फे लढणाऱ्या तेजस्वी घोसाळकर यांनी दहिसर प्रभाग क्रमांक २ मध्ये १०,७५५ मतांनी मोठा विजय मिळवला आहे.
BJP candidate from Dahisar Tejaswi Ghosalkar won : मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत अनेक प्रभागांकडे राज्याचं लक्ष होतं, पण दहिसर प्रभाग क्रमांक २ ची लढत केवळ राजकीय नव्हती, ती कौटुंबिक आणि भावनिक संघर्षाचा एक मोठा अध्याय होती. भाजपच्या तेजस्वी घोसाळकर यांनी १०,७५५ मतांच्या मोठ्या फरकाने मिळवलेला विजय हा शिवसेना (उबाठा) गटासाठी केवळ एका जागेचा पराभव नसून, एका निष्ठावान बालेकिल्ल्याला पडलेलं भगदाड आहे.
मैत्री विरुद्ध राजकारण
या निवडणुकीचे वैशिष्ट्य म्हणजे समोरासमोर असलेल्या दोन उमेदवार एकेकाळच्या मैत्रिणी होत्या. धनश्री कोलगे यांनी ही लढाई 'निष्ठावंत विरुद्ध गद्दार' अशी करण्याचा प्रयत्न केला. मात्र, दहिसरच्या मतदारांनी या भावनिक आवाहनापेक्षा तेजस्वी घोसाळकर यांच्या चेहऱ्याला आणि भाजपच्या संघटनशक्तीला अधिक पसंती दिल्याचे निकालावरून स्पष्ट झाले आहे.
घोसाळकर कुटुंबातील राजकीय दरी
अभिषेक घोसाळकर यांच्या दुर्दैवी हत्येनंतर दहिसरमधील समीकरणं पूर्णपणे बदलली. शिवसेनेचे जुने जाणते नेते विनोद घोसाळकर यांनी आपल्या सुनेच्या विरोधात उभे राहून पक्षाचा प्रचार केला. प्रचारादरम्यान सुनेच्या बंडाने त्यांच्या डोळ्यात आलेले अश्रू संपूर्ण मुंबईने पाहिले. तरीही, तेजस्वी घोसाळकर यांनी भाजपची साथ धरत आपली स्वतंत्र राजकीय वाट निवडली. मुंबई बँकेच्या संचालकपदापासून सुरू झालेला हा प्रवास अखेर विजयापर्यंत पोहोचला आहे.
ठाकरे गटाला 'धक्का' का?
१. गडाला खिंडार: घोसाळकर कुटुंब हे मातोश्रीच्या अत्यंत जवळचे मानले जायचे. त्या घरातील सून भाजपमध्ये जाणे आणि मोठ्या फरकाने निवडून येणे, हे ठाकरे गटाच्या 'निष्ठा' या मुद्द्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित करणारे आहे. २. मतांचे समीकरण: पहिल्या फेरीपासूनच तेजस्वी यांनी घेतलेली आघाडी शेवटपर्यंत तुटू शकली नाही. धनश्री कोलगे यांना मिळालेली मते ही पक्षाच्या केडरची असली, तरी सर्वसामान्य मतदारांनी तेजस्वी यांच्या बाजूने कौल दिला. ३. भाजपची रणनीती: प्रवीण दरेकर आणि भाजपच्या स्थानिक फळीने तेजस्वी घोसाळकर यांना दिलेल्या पाठिंब्यामुळे, शिवसेनेच्या या जुन्या बालेकिल्ल्यात कमळ फुलवण्यात त्यांना यश आले.


