Mumbai News : येत्या रविवारी होणाऱ्या ‘टाटा मुंबई मॅरेथॉन 2026’ मुळे दक्षिण व मध्य मुंबईतील वाहतूक व्यवस्थेत मोठे बदल होणार आहेत. या स्पर्धेदरम्यान अनेक बेस्ट बस मार्ग वळवण्यात आले असून, काही मार्ग तात्पुरते बंद ठेवण्यात येणार आहेत. 

मुंबई : मुंबईची शान असलेली ‘टाटा मुंबई मॅरेथॉन 2026’ येत्या रविवारी, 18 तारखेला उत्साहात पार पडणार आहे. या आंतरराष्ट्रीय मॅरेथॉन स्पर्धेमुळे दक्षिण व मध्य मुंबईतील वाहतूक व्यवस्थेत मोठे बदल करण्यात आले असून, त्याचा थेट परिणाम बेस्ट बस सेवांवर होणार आहे. अनेक बस मार्ग वळवण्यात आले आहेत, तर काही मार्ग तात्पुरते बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

बेस्ट बस सेवेत मोठे फेरबदल

मॅरेथॉन स्पर्धा पहाटे 5 वाजल्यापासून दुपारी 1.30 वाजेपर्यंत सुरू राहणार आहे. या कालावधीत स्पर्धेच्या मार्गावर वाहतुकीस कडक निर्बंध लागू असतील. त्यामुळे त्या मार्गांवरून धावणाऱ्या बेस्ट बसगाड्या पर्यायी मार्गांनी वळवण्यात येणार आहेत. मॅरेथॉनचा मुख्य मार्ग छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CSMT) येथून सुरू होऊन हुतात्मा चौक, चर्चगेट, मरीन ड्राईव्ह, पेडर रोड, हाजी अली, वांद्रे-वरळी सागरी सेतू (सी-लिंक), माहिम आणि प्रभादेवी असा असणार आहे.

बदललेले पर्यायी बस मार्ग

वाहतूक पोलिसांनी घातलेल्या निर्बंधांनुसार काही बेस्ट बसगाड्या शीव (सायन) मार्गे डॉ. बाबासाहेब आंबेडकर मार्ग, जे.जे. रुग्णालय, कर्नाक बंदर पूल, पी. डिमेलो रोड आणि शहीद भगतसिंग मार्गे धावणार आहेत. तर माहिमकडे जाणाऱ्या बसगाड्या सेनापती बापट मार्ग, डॉ. ई. मोझेस मार्ग, महालक्ष्मी स्थानक आणि सातरस्ता मार्गे वळवण्यात येणार आहेत.

हे बेस्ट बस मार्ग राहणार पूर्णपणे बंद

प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी आणि मॅरेथॉन सुरळीत पार पडण्यासाठी खालील बेस्ट बस मार्ग तात्पुरते बंद ठेवण्यात येणार आहेत. अ-76, अ-77, अ-78, अ-105, अ-106, अ-108, अ-112, अ-118, अ-123, अ-132, अ-137 आणि अ-155

प्रवाशांसाठी महत्त्वाचे आवाहन

रविवारी सकाळी प्रवास करण्यापूर्वी प्रवाशांनी बदललेल्या मार्गांची आणि वेळापत्रकाची माहिती घेण्याचे आवाहन बेस्ट प्रशासनाकडून करण्यात आले आहे. दुपारी 1.30 नंतर सर्व बेस्ट बस सेवा पूर्ववत सुरू करण्यात येणार आहेत.