- Home
- Utility News
- 10वी पास बेरोजगार तरुणांसाठी सुवर्णसंधी! पोस्ट विभाग देतो स्वतःचा व्यवसाय; फक्त ‘या’ 3 अटी आवश्यक
10वी पास बेरोजगार तरुणांसाठी सुवर्णसंधी! पोस्ट विभाग देतो स्वतःचा व्यवसाय; फक्त ‘या’ 3 अटी आवश्यक
India Post Franchise Scheme : भारतीय टपाल विभागाने 10वी उत्तीर्ण बेरोजगारांसाठी पोस्ट ऑफिस फ्रँचायझी योजना सुरू केली. यात पोस्ट ऑफिस नसलेल्या भागात तरुणांना स्वतःचे केंद्र उघडून टपाल सेवा पुरवता येतील, व्यवहारावर कमिशनद्वारे उत्पन्न मिळवता येईल.

10वी पास बेरोजगार तरुणांसाठी सुवर्णसंधी!
पुणे : दहावी किंवा बारावी उत्तीर्ण असूनही नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी आनंदाची बातमी आहे. भारतीय टपाल विभागाने (India Post) रोजगारनिर्मिती आणि टपाल सेवांचा विस्तार करण्याच्या उद्देशाने ‘पोस्ट ऑफिस फ्रँचायझी योजना’ सुरू केली आहे. या योजनेमुळे शहरी व ग्रामीण भागातील बेरोजगारांना स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याची संधी मिळणार आहे.
पोस्ट ऑफिस नसलेल्या भागात सेवा थेट नागरिकांपर्यंत
ज्या भागात अद्याप पोस्ट ऑफिसची सुविधा उपलब्ध नाही, त्या ठिकाणी फ्रँचायझीच्या माध्यमातून टपाल सेवा सुरू केली जाणार आहे. यामुळे नागरिकांना आवश्यक सेवा त्यांच्या परिसरातच मिळणार असून तरुणांना नियमित उत्पन्नाचे साधन उपलब्ध होणार आहे.
फ्रँचायझी केंद्रावर मिळणार ‘या’ सुविधा
या फ्रँचायझी केंद्रांमधून नागरिकांना पुढील सेवा दिल्या जाणार आहेत.
पत्रांचे बुकिंग व वितरण
स्पीड पोस्ट व नोंदणीकृत टपाल सेवा
पार्सल सेवा
पोस्ट ऑफिस बचत खाते
मासिक उत्पन्न योजना (MIS)
विमा योजना
वीज, पाणी व इतर बिलांचा भरणा
विशेष बाब म्हणजे या योजनेत ठराविक पगार नसून प्रत्येक व्यवहारावर कमिशन किंवा मानधन दिले जाणार आहे. त्यामुळे कामाच्या प्रमाणावर उत्पन्न वाढण्याची संधी असेल.
पात्रता आणि महत्त्वाच्या अटी
या योजनेसाठी अर्ज करण्यासाठी खालील अटी पूर्ण करणे आवश्यक आहे.
1) शैक्षणिक पात्रता
उमेदवार किमान 10 वी किंवा 12 वी उत्तीर्ण असावा.
2) नागरिकत्व
अर्जदार भारतीय नागरिक आणि संबंधित भागातील स्थानिक रहिवासी असणे बंधनकारक आहे.
3) जागा व आवश्यक साधने
स्वतःच्या मालकीची किमान 50 चौरस मीटर जागा
संगणक, इंटरनेट कनेक्शन
प्रिंटर, वजनकाटा
बारकोड स्कॅनर
स्मार्टफोन
निवड प्रक्रिया कशी असेल?
निवड झालेल्या उमेदवारांशी सुरुवातीला एक वर्षाचा करार करण्यात येईल. कामगिरी समाधानकारक असल्यास कराराचे नूतनीकरण करण्यात येईल. मात्र, सेवा अपेक्षेप्रमाणे न दिल्यास फ्रँचायझी रद्द करण्याचे अधिकार पोस्ट विभागाकडे असतील. याबाबत माहिती देताना जनसंपर्क अधिकारी नितीन बने यांनी सांगितले की, “जिथे पोस्ट ऑफिस उपलब्ध नाही, त्या ठिकाणी मर्यादित पण अत्यावश्यक टपाल सेवा फ्रँचायझीच्या माध्यमातून दिल्या जातील.”

