बारामती तालुक्यातील मासाळवाडी येथे पतीच्या विवाहबाह्य संबंध आणि सततच्या त्रासाला कंटाळून २२ वर्षीय विवाहितेने गळफास घेऊन आत्महत्या केली. या प्रकरणी पोलिसांनी पतीविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

बारामती: पतीच्या विवाहबाह्य संबंध आणि सततच्या मानसिक-शारीरिक त्रासाला कंटाळून एका २२ वर्षीय विवाहितेने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची हृदयद्रावक घटना बारामती तालुक्यातील मासाळवाडी येथे घडली आहे. या प्रकरणी वडगाव निंबाळकर पोलिसांनी मृत महिलेच्या पतीविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

Add Asianetnews Marathi as a Preferred SourcegooglePreferred

श्रेया देडे (वय २२, रा. मासाळवाडी, ता. बारामती) असे आत्महत्या केलेल्या विवाहितेचे नाव आहे. लग्नापूर्वी तिचे नाव श्रेया रामचंद्र जाधव असे होते. या घटनेमुळे सोमेश्वरनगर परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, श्रेयाने नऊ महिन्यांपूर्वी शिवाजी माणिक देडे याच्याशी प्रेमविवाह केला होता. मात्र, लग्नानंतरही शिवाजीचे 'सानिया कुरेशी' नावाच्या दुसऱ्याच मुलीशी इन्स्टाग्राम आणि व्हॉट्सअॅपवर चॅटिंग सुरू होते. इतकेच नव्हे, तर तो त्या मुलीशी लग्न केल्याचे सांगून तिला घरी घेऊन आल्याचा आरोपही श्रेयाच्या कुटुंबीयांनी केला आहे.

श्रेयाने पतीला समजावून सांगण्याचा प्रयत्न केला असता, त्याने तिचे ऐकले नाही. उलट, तो तिला शारीरिक आणि मानसिक त्रास देऊ लागला. या सततच्या छळाला कंटाळून अखेर श्रेयाने शनिवारी (दि. २४) दुपारी राहत्या घरात लोखंडी अँगलला साडीने गळफास घेऊन आपले जीवन संपवले.

या घटनेची माहिती मिळताच श्रेयाचा भाऊ प्रीतम रामचंद्र जाधव (रा. शिरढोण, ता. कोरेगाव, जि. सातारा) याने वडगाव निंबाळकर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, पोलिसांनी पती शिवाजी माणिक देडे याच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

या प्रकरणाचा पुढील तपास उपविभागीय पोलिस अधिकारी सुदर्शन राठोड करत आहेत. या घटनेने परिसरात खळबळ उडाली असून, विवाहबाह्य संबंधांमुळे एका विवाहितेला जीव गमवावा लागल्याने नागरिकांकडून संताप व्यक्त केला जात आहे.