आमदार रोहित पवार यांनी महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांचे मंत्रीपद धोक्यात असल्याचा दावा केला आहे. त्यांच्या जागी सुनील शेळके यांना संधी मिळू शकते, असे सूचित करत त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमधील अंतर्गत संघर्षाला आणि नव्या चर्चांना तोंड फोडले आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सुरू असलेल्या अंतर्गत घडामोडींवरून पुन्हा एकदा राजकीय वातावरण तापलं आहे. आमदार रोहित पवार यांनी महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांच्या मंत्रीपदाबाबत मोठा दावा करत पक्षात नव्या चर्चांना तोंड फोडलं आहे.

Add Asianetnews Marathi as a Preferred SourcegooglePreferred

क्लिपमध्ये काय आहे? 

रोहित पवार यांनी माध्यमांशी बोलताना आदिती तटकरेंचं मंत्रीपद धोक्यात येऊ शकतं, असा दावा केला. त्यांच्या जागी आमदार सुनील शेळके यांना मंत्रिपदाची संधी मिळू शकते, असंही त्यांनी सूचित केलं. पुढील काही महिन्यांत पक्षात मोठे बदल होऊ शकतात, असं वक्तव्य त्यांनी केलं. राष्ट्रवादीतील दोन वरिष्ठ नेत्यांच्या कथित ऑडिओ क्लिपमुळे सध्या पक्षात मोठी धुसफूस सुरू असल्याचं बोललं जात आहे. या क्लिपमध्ये अजित पवार यांच्याविरोधात आक्षेपार्ह भाषा वापरल्याचा दावा रोहित पवार यांनी केला. ही क्लिप सुनेत्रा पवार आणि पार्थ पवार यांनी ऐकल्याचंही त्यांनी सांगितलं.

भाजपच्या तिकिटावर कोण लढणार? 

सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांना पक्षात साईडलाईन केलं जात असल्याच्या चर्चांनाही रोहित पवार यांनी दुजोरा दिला. अनुभवी नेत्यांना अचानक दूर केलं जात नाही, त्यामुळे पक्षात काहीतरी मोठं शिजत असल्याचा दावा त्यांनी केला. यामुळे राष्ट्रवादीतील अंतर्गत संघर्ष पुन्हा एकदा समोर आला आहे. दरम्यान, सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल हे भविष्यात भाजपच्या तिकिटावर निवडणूक लढवू शकतात, असा खळबळजनक दावाही रोहित पवार यांनी यापूर्वी केला होता. त्यांच्या या वक्तव्यामुळे राज्याच्या राजकारणात मोठी चर्चा रंगली होती. मात्र तटकरे यांनी हे आरोप फेटाळून लावत रोहित पवारांवरच पलटवार केला होता.

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये नेतृत्व, पदबदल आणि आगामी राजकीय समीकरणांबाबत सुरू असलेल्या चर्चांमुळे महायुतीच्या राजकारणातही उत्सुकता वाढली आहे. पक्षाने अधिकृतपणे कोणतीही भूमिका जाहीर केलेली नसली तरी रोहित पवार यांच्या वक्तव्यांमुळे राष्ट्रवादीतील अंतर्गत संघर्ष पुन्हा ऐरणीवर आला आहे.