Sharad Pawar Health Update : राष्ट्रवादी काँग्रेस (पवार गट) अध्यक्ष शरद पवार यांच्यावर पुण्यातील रुबी हॉल क्लिनिकमध्ये उपचार सुरू असून त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होत आहे.
Sharad Pawar Health Update : ज्येष्ठ नेते आणि राष्ट्रवादी काँग्रेस पवार गटाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्या प्रकृतीबाबत दिलासादायक बातमी समोर आली आहे. गेल्या तीन दिवसांपासून पुण्यातील रुबी हॉल क्लिनिकमध्ये त्यांच्यावर उपचार सुरू असून त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होत असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. मात्र पूर्णपणे बरे होण्यासाठी डॉक्टरांनी त्यांना आणखी पाच दिवस रुग्णालयात राहण्याचा सल्ला दिला आहे.
नेमका त्रास काय?
माहितीनुसार, शरद पवार यांना छातीत कफ (चेस्ट कंजेशन) साचल्यामुळे अस्वस्थता जाणवत होती. यामुळे श्वास घेण्यास तसेच बोलताना त्रास होत होता. वयोमान लक्षात घेता कोणताही धोका टाळण्यासाठी त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी प्राथमिक तपासणीनंतर आवश्यक त्या वैद्यकीय चाचण्या केल्या आहेत.
तज्ज्ञ डॉक्टरांच्या देखरेखीखाली उपचार
रुबी हॉल क्लिनिकमधील तज्ज्ञ डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली औषधोपचार सुरू आहेत. छातीतील कफ कमी करण्यावर विशेष भर दिला जात आहे. वाढता जनसंपर्क आणि सततचा दौरा कार्यक्रम लक्षात घेता डॉक्टरांनी त्यांना पूर्ण बेड रेस्टचा सल्ला दिला आहे, जेणेकरून संसर्गाचा धोका टाळता येईल.
दौरे आणि गाठीभेटी रद्द
डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार पुढील काही दिवस शरद पवार यांचे सर्व नियोजित दौरे आणि सार्वजनिक कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत. रुग्णालयात कार्यकर्ते किंवा नेत्यांनी भेट देऊ नये, अशी सूचना देण्यात आली आहे. त्यांच्या निकटवर्तीयांनी “प्रकृती स्थिर असून काळजी करण्याचे कारण नाही,” असे स्पष्ट केले आहे.
संयम राखण्याचे आवाहन
राज्यभरातून शरद पवार यांच्या प्रकृतीची विचारपूस होत असताना डॉक्टरांनी सर्वांना संयम राखण्याचे आवाहन केले आहे. पुढील काही दिवस त्यांच्यावर बारकाईने लक्ष ठेवले जाणार असून पूर्णपणे बरे झाल्यानंतरच डिस्चार्ज दिला जाणार आहे.


