सार

हडपसरमधील सतीश वाघ हत्या प्रकरणात धक्कादायक खुलासा झाला आहे. त्यांची पत्नी मोहिनी वाघ हिनेच प्रियकरासोबत मिळून हत्येचा कट रचल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे. अनैतिक संबंध, आर्थिक वाद आणि मारहाणीमुळे मोहिनीने हे कृत्य केल्याचे पोलीसांचे म्हणणे आहे.

पुणे: हडपसरच्या सतीश वाघ हत्या प्रकरणात मोठी अपडेट समोर आली आहे. भाजपचे आमदार योगेश टिळेकर यांचे सख्खे मामा सतीश वाघ यांची ९ डिसेंबरला अपहरण करून हत्या करण्यात आली होती. मात्र सतीश वाघ यांची हत्या पैशांसाठी किंवा राजकीय हेतूने नाही तर अनैतिक संबंधांतून झाल्याचं समोर आले आहे. सतीश वाघ यांची हत्या त्यांची बायको मोहिनी वाघ हिने घडवून आणली. पुणे पोलिसांनी मोहिनी वाघ हिला अटक केली आहे.

अतिरिक्त पोलीस आयुक्त (गुन्हे) शैलेश बलकवडे यांनी याबाबतची माहिती दिली आहे. आतापर्यंत या प्रकरणात सहा जणांना अटक करण्यात आली आहे. अक्षय आणि मोहिनी यांनीच सतीश वाघ यांच्या हत्येचा कट रचला होता. तर इतर चौघेही या हत्येत सहभागी होते, असं शैलेश बलकवडे यांनी सांगितलं. सतीश वाघ यांच्या हत्येच्या १५ दिवस आधीपासून मोहिनी आणि अक्षय या दोघांनी हा कट रचला होता. दरम्यान, याबाबत पोलीस अधिक तपास करत आहेत

अनैतिक संबंधातून हत्या

मोहिनी वाघने प्रियकर अक्षय जावळकर याला पाच लाखांची सुपारी देऊन सतीश वाघ यांची हत्या केली. अनैतिक संबंधात अडसर, आर्थिक व्यवहार न करू देणे, शिवाय दारु पिऊन सतत मारहाण यामुळ मोहिनीनं सतीश वाघ यांच्या हत्येचा कट रचला, असं पोलीस तपासात समोर आलंय. ९ डिसेंबर रोजी सतीश वाघ यांचं हडपसर परिसरातून अपहरण करून काही मिनिटांमध्ये गाडीत हत्या करण्यात आली होती. त्यांना ७२ वेळा भोकसून हत्या करण्यात आली.

घटनाक्रम :

२००१ साली अक्षय जावळकरचे आईवडील सतीश वाघ यांच्या फुरसुंगीतील खोलीत किरायाने राहायला आले. अक्षय तेव्हा नऊ वर्षांचा होता. त्याचे आई वडील वडापाव विकायचे तर सतीश वाघ यांचं ब्लूबेरी नावाचं मोठं हॉटेल त्याच भागात होतं.

सतीश वाघ यांचा मुलगा आणि अक्षय यांच्यात मैत्री झाली आणि अक्षयचे सतीश वाघ यांच्या घरी येणे जाणे सुरू झाले. अक्षय जेव्हा २१ वर्षांचा झाला तेव्हा त्याचे ३७ वर्षांच्या मोहिनी वाघ हिच्याशी प्रेमसंबंध निर्माण झाले होते. दरम्यान, अक्षयने अभियांत्रिकीचे शिक्षण पूर्ण केले. मात्र, २०१६ ला अक्षयचे लग्न करायचे ठरल्याने अक्षय आणि त्याचे आई वडील दुसऱ्या ठिकाणी किरायाच्या जागेत राहायला गेले. मात्र लग्नानंतर देखील अक्षय आणि मोहिनीचे प्रेमसंबंध सुरूच होते. सतीश वाघ यांना याबाबत समजताच मोहिनी आणि त्यांच्यात पुन्हा वादांना सुरुवात झाली. प्रेमसंबंधात सतीश वाघ हे अडसर ठरत होते. त्यामुळं दोघांनी सतीश वाघ यांची हत्या करण्याचा निर्णय घेतला.

मोहिनी वाघ हिनं अक्षयला पाच लाखांची सुपारी दिली आणि हत्येचा कट रचला. अक्षयने त्याच्या मित्रांना यात सहभागी करून घेतलं. ९ डिसेंबर रोजी सकाळी फिरायला गेलेल्या सतीश वाघ यांचं अपहरण केले आणि काही वेळातच त्यांची हत्या केली. त्यांना ७२ वेळा भोसकले. मात्र हे पैशांसाठी केलेले अपहरण आहे असा बनाव करण्यात आला. मात्र पोलिसांनी मोहिनी आणि अक्षयची पार्श्वभूमी तपासली, दोघांचे कॉल रेकॉर्ड तपासले आणि हत्येचा उलघडा झाला.

पत्नीचा खोटा आक्रोश

हत्येनंतर आपल्यावर संशय येऊ नये म्हणून मोहिनीने आपल्या पतीच्या निधनाचे दुःख झाल्याचं नाटक केलं होतं. पोलिसांसमोर रडण्याचे नाटक केले होते. सतीश वाघ यांच्या हत्येनंतर ज्यावेळी पोलीस मोहिनी वाघ यांच्या घरी चौकशीसाठी गेले, त्यावेळी पतीच्या जाण्याने दु ख झाल्याचे नाटक करून ती मोठ्याने रडायची. आपल्या रडण्याने पोलिसांना आपल्यावर संशय येणार नाही, असे तिला वाटायचे मात्र मोहिनीच्या जवळच्या व्यक्तीनीच पोलिसांना अक्षय जावळकर याच्याशी तिचे गेल्या काही वर्षांपासून अनैतिक संबंध असल्याचे सांगितले त्यानुसार पोलिसांनी पुढील तपास केला. तेव्हा अक्षय जावळकर फरार होता. पुढील काही दिवसांत पोलिसांनी त्याला बेड्या ठोकल्यावर प्रकरणाचा छडा लागला.

आणखी वाचा-

१३ वर्षीय मुलीवर अत्याचार, भ्रूण जन्म, दोघांचा मृत्यू

NEET अभ्यासक्रमी छात्रेवर अत्याचार: मदतीच्या बहाण्याने अनेक वेळा बलात्कार