Water Supply Update: छत्रपती संभाजीनगरमध्ये नवीन पाणीपुरवठा योजनेच्या कामासाठी सहा दिवसांचा शटडाऊन जाहीर केला. टाकळी फाटा येथे मुख्य जलवाहिनी जोडणीच्या कामामुळे शहरातील पाणीपुरवठा विस्कळीत होणार असून, नागरिकांना पाणी जपून वापरण्याचे आवाहन करण्यात आले

छत्रपती संभाजीनगर: छत्रपती संभाजीनगरकरांनो, पुढील काही दिवस पाण्याचा वापर जपून करा! शहरातील पाणीपुरवठ्यावर मोठा परिणाम करणारे महत्त्वाचे काम महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडून हाती घेण्यात आले आहे. यासाठी सहा दिवसांचा शटडाऊन जाहीर करण्यात आला असून, अनेक भागांमध्ये पाणीपुरवठा उशिराने मिळण्याची शक्यता आहे.

टाकळी फाटा येथे मुख्य जलवाहिनी जोडणी; त्यामुळे शटडाऊन आवश्यक

नवीन पाणीपुरवठा योजनेअंतर्गत पैठण रोडवरील टाकळी फाटा येथे 2500 मिमी व्यासाची मुख्य जलवाहिनी जोडण्याचे काम सुरू होणार आहे. या कामासाठी रविवारपासून सलग सहा दिवस पाणीपुरवठा विस्कळीत राहणार आहे. सध्या शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या 900 मिमी व्यासाच्या जलवाहिनीवर शटडाऊन लागू असल्याने पाणी वितरणात 1 ते 2 दिवस उशीर होण्याची शक्यता महापालिकेने व्यक्त केली आहे. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या विनंतीनुसार हा खंडणकाळ मंजूर करण्यात आला आहे.

गळती दुरुस्तीसुद्धा या काळात पूर्ण

शटडाऊनच्या दरम्यान ढोरकीन पंपहाऊस परिसरातील 900 मिमी जलवाहिनीला लागलेली मोठी गळतीही दुरुस्त करण्यात येणार आहे. त्यामुळे या सहा दिवसांत मुख्य जोडणी आणि गळती दुरुस्ती अशी दोन्ही महत्त्वाची कामे पूर्ण होतील.

मर्यादित क्षमतेने पाणीपुरवठा सुरू

शटडाऊनदरम्यान फक्त 700 मिमी आणि 1200 मिमीच्या दोन जलवाहिन्यांवरूनच पाणीपुरवठा होईल. त्यामुळे उपलब्ध पाण्याचे प्रमाण 125 एमएलडीवर सीमित राहणार आहे. परिणामी अनेक भागांमध्ये पुरवठा वेळेवर न होण्याची शक्यता आहे.

या भागांना होणार सर्वाधिक विलंब

कार्यकारी अभियंता किरण धांडे यांनी दिलेल्या माहितीनुसार खालील भागांमध्ये पाणीपुरवठा अधिक उशिरा मिळू शकतो.

चिकलठाणा

हनुमान टेकडी

विश्वभारती कॉलनी

महापालिकेने नागरिकांना पुढील काही दिवस पाण्याचा वापर काटकसरीने आणि नियोजनपूर्वक करण्याचे आवाहन केले आहे.