- Home
- Maharashtra
- 'फक्त १ तासात'! संभाजीनगर-पुणे विमानसेवा सुरू होणार?, फ्लाय ९१ ची मोठी मागणी; लोहगाव Air Force ने 'हा' निर्णय घेतल्यास ८ तासांची ट्रॅफिक सुटणार!
'फक्त १ तासात'! संभाजीनगर-पुणे विमानसेवा सुरू होणार?, फ्लाय ९१ ची मोठी मागणी; लोहगाव Air Force ने 'हा' निर्णय घेतल्यास ८ तासांची ट्रॅफिक सुटणार!
Chhatrapati Sambhajinagar To Pune Flight Service: फ्लाय 91 कंपनी छत्रपती संभाजीनगर ते पुणे दरम्यान नवीन विमानसेवा सुरू करण्यास तयार आहे, ज्यामुळे 8-9 तासांचा त्रासदायक प्रवास केवळ 30-40 मिनिटांत पूर्ण होऊ शकतो.

छत्रपती संभाजीनगर–पुणे प्रवास होणार अधिक सुकर!
छत्रपती संभाजीनगर: छत्रपती संभाजीनगर ते पुणे हे अंतर फक्त 240 किलोमीटर असले तरी खडबडीत रस्ते, वाहतूक कोंडी आणि वाईट रस्त्यांच्या स्थितीमुळे 8 ते 9 तासांचा त्रासदायक प्रवास करावा लागतो. या पार्श्वभूमीवर संभाजीनगरकरांसाठी दिलासादायक ठरू शकणारी नवीन विमानसेवा सुरू करण्यासाठी ‘फ्लाय 91’ कंपनी पुढे सरसावली आहे.
विमानसेवा सुरू करण्याची तयारी, पण पुणे विमानतळावरील स्लॉट समस्या आडवी
फ्लाय 91 कंपनीने छ. संभाजीनगर–पुणे दरम्यान दररोज दोन विमानफेऱ्या सुरू करण्याचे नियोजन केले आहे. त्यांच्या ATR 71-600 विमानांद्वारे ही सेवा तत्काळ सुरू होऊ शकते. मात्र पुणे विमानतळावरील स्लॉटअभावी ही योजना सध्या अडथळ्यात अडकली आहे. त्यामुळे फ्लाय 91 तर्फे लोहगाव एअरफोर्स स्टेशनकडे दिवसातून दोन स्लॉट देण्याची अधिकृत मागणी करण्यात आली असून, आता या निर्णयावर सर्वांचे लक्ष केंद्रीत झाले आहे.
छ. संभाजीनगर–पुणे विमानसेवेला मिळू शकतो मोठा प्रतिसाद
औरंगाबाद टुरिझम डेव्हलपमेंट फाउंडेशनच्या सिव्हिल एव्हिएशन कमिटीचे चेअरमन सुनीत कोठारी यांनी लोहगाव येथे एअर कमोडोर यांच्याकडे सादर केलेल्या निवेदनात या मार्गाला मोठी मागणी असून विमानसेवेला उत्कृष्ट प्रतिसाद मिळेल, असा विश्वास व्यक्त केला आहे. त्यामुळेच या प्रस्तावाचा सहानुभूतीपूर्वक विचार करावा, अशी विनंतीही त्यांनी केली आहे.
पुणे विमानतळावर स्लॉट का उपलब्ध नाहीत?
पुणे विमानतळ हे हवाई दलाच्या (Air Force) ताब्यात असल्यामुळे येथे नागरी उड्डाणांना मर्यादा आहेत.
पुण्यातून देशातील अनेक शहरांकडे मोठ्या प्रमाणावर हवाईसेवा
दिवसभरात सुमारे 100 फ्लाइट्सची धाव
अतिरिक्त स्लॉटची उपलब्धता जवळजवळ शून्य
सुखोई विमानांचा सरावही नियमित असल्याने नागरी विमानांना अडथळे
या सर्व कारणांमुळे नवीन विमानसेवांना स्लॉट देणे आव्हानात्मक ठरत आहे.
छ. संभाजीनगर–पुणे विमानसेवा सुरू
छ. संभाजीनगर–पुणे विमानसेवा सुरू झाल्यास 8-9 तासांचा त्रासदायक प्रवास केवळ 30-40 मिनिटांत पूर्ण होऊ शकतो. प्रवाशांची मोठी मागणी लक्षात घेता फ्लाय 91 कंपनीची योजना महत्त्वाची मानली जात आहे. आता हवाई दलाकडून स्लॉट मिळतो की नाही, हेच पाहणे सर्वांसाठी उत्सुकतेचे ठरणार आहे.

