- Home
- Maharashtra
- पुणे-सातारा महामार्गाची दयनीय अवस्था, खड्डेच खड्डे, देखभाल नाहीच, टोल मात्र नियमित, चालकांना चंद्रावर गाडी चालवल्याचा येतोय अनुभव!
पुणे-सातारा महामार्गाची दयनीय अवस्था, खड्डेच खड्डे, देखभाल नाहीच, टोल मात्र नियमित, चालकांना चंद्रावर गाडी चालवल्याचा येतोय अनुभव!
पुणे - पुणे-सातारा दरम्यान असलेला राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४८ (NH-48) सध्या अत्यंत खराब स्थितीत आहे. हा मार्ग आता अपघातांसाठी ओळखला जात आहे. मोठमोठे खड्डे, पाण्याने भरलेली खाचखळगे आणि देखभालीचा पूर्ण अभाव यामुळे वाहनधारकांचा जीव धोक्यात आला आहे.

#PuneSatara आणि #NH48 हे हॅशटॅग ट्रेंड
तक्रारींचा पाऊस पडत असतानाही प्रशासन आणि संबंधित टोल ऑपरेटर यांच्याकडून ठोस पावले उचलली जात नसल्याने नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. सोशल मीडियावर #PuneSatara आणि #NH48 हे हॅशटॅग ट्रेंड होत असून, अनेक नागरिकांनी प्रत्यक्ष व्हिडिओ आणि फोटो शेअर करून रस्त्याची बिकट अवस्था दाखवली आहे.
महामार्गाच्या दोन्ही मार्गांवर (पुण्याहून सातारा आणि साताराहून पुणे) अनेक ठिकाणी तब्बल १ ते २ फूट खोल खड्डे पडले आहेत. पावसामुळे हे खड्डे अधिकच धोकादायक बनले असून, त्यात पाणी भरल्याने वाहनधारकांना अंदाज येत नाही आणि अचानक ब्रेक द्यावा लागतो. त्यामुळे मागून येणाऱ्या वाहनांना धडक बसण्याची शक्यता वाढते.
अचानक ब्रेक लागल्याने मागचं वाहन धडकते
दरम्यान, दर १०-१५ किलोमीटर अंतरावर टोल प्लाझा असून देखील, रस्त्याची गुणवत्ता अत्यंत खराब आहे. वाहनधारकांनाही प्रश्न पडला आहे की, इतका टोल भरूनही देखभाल का केली जात नाही? पुण्याहून साताराकडे प्रवास करताना सुरळीत प्रवास होण्याऐवजी लोकांना थांब-थांब करून, खड्ड्यांना चुकवत जावे लागते. ही अवस्था केवळ वेळखाऊ नाही, तर वाहनांचेही मोठ्या प्रमाणावर नुकसान करणारी आहे.
वाहनचालक, विशेषतः दुचाकी आणि लहान चारचाकी वाहन चालक, रोजच्या प्रवासात जीव मुठीत घेऊन चालत आहेत. अपघातांची संख्याही वाढत असून, अनेक अपघात नोंदवले गेले आहेत जिथे खड्ड्यांमुळे अचानक ब्रेक लागल्याने मागचं वाहन धडकले. काही गंभीर जखमींचीही नोंद आहे.
दोन्ही संस्था एकमेकांवर जबाबदारी टाकताहेत
रस्त्याची जबाबदारी सार्वजनिक बांधकाम विभाग (PWD) आणि NHAI (राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण) यांच्यावर असून, दोन्ही संस्था एकमेकांवर जबाबदारी टाकत असल्याचा आरोप होत आहे. दरम्यान, स्थानिक राजकारणी आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी आवाज उठवण्यास सुरुवात केली आहे. काहींनी तर टोल न भरता निषेध नोंदवण्याचा इशाराही दिला आहे.
विशेष निधी जाहीर करावा
नागरिकांच्या मते, प्रशासनाने तात्काळ या रस्त्याच्या दुरुस्तीसाठी विशेष निधी जाहीर करावा. सातत्याने टोल वसूल करणे आणि त्यानुसार सेवा न देणे म्हणजे प्रवाशांची फसवणूक असल्याचे मत आता जनतेत रुजू होत आहे.

