सार
Pune Rain Update: पुण्यात पुढील दोन ते तीन दिवस मुसळधार पावसाची शक्यता आहे. कोकण, घाटमाथा आणि विदर्भातही पावसाचा जोर वाढणार आहे.
Pune Rain Update : पुण्यात पुढील दोन ते तीन दिवसात पुन्हा मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. राज्यात मोसमी पावसाचा जोर पुन्हा वाढणार असल्याचा अंदाज पुणे वेधशाळेने वर्तवला आहे. कोकण किनारपट्टी, घाटमाथा, विदर्भात पुढील दोन ते तीन दिवस पावसाचा जोर वाढण्याची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे. घाटमाथ्यावर मध्यम ते अति मुसळधार पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे.
किनारपट्टीवरील हवेच्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे अरबी समुद्रातून वेगाने बाष्पयुक्त वारे किनारपट्टीवर येत आहे. वाऱ्याचा वेग जास्त असल्यामुळे किनारपट्टीसह पश्चिम घाटमाथ्यावर पुढील तीन दिवस पावसाचा जोर कायम राहणार आहे. पश्चिम बंगालमधील वाऱ्याच्या चक्रीय स्थितीचा परिणाम म्हणून उत्तर विदर्भामध्ये, उत्तर मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रामध्ये पावसाचा जोर वाढण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
राज्यातील या भागात गुरुवारी मुसळधार पावसाचा इशारा
गुरुवारी कोकणातील रायगड आणि रत्नागिरी या दोन जिल्ह्यांना पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर पश्चिम महाराष्ट्रातील पुणे, सातारा आणि कोल्हापूर या जिल्ह्यांना पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. तसेच विदर्भातील चंद्रपूर, गडचिरोली आणि गोंदिया या जिल्ह्यांना पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. तसेच मुंबईसह ठाणे, सिंधुदुर्ग, यवतमाळ, नागपूर, वर्धा आणि भंडारा या जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.
या जिल्ह्यांना अलर्ट जारी
ऑरेंज अलर्ट
कोल्हापूर, रत्नागिरी, रायगड, सातारा, पुणे. गडचिरोली, चंद्रपूर, गोंदिया.
यलो अलर्ट
सिंधुदुर्ग, मुंबई, ठाणे, यवतमाळ, वर्धा, नागपूर, भंडारा.
जिल्ह्याला पाणी पुरवठा करणाऱ्या धरणात 90% पेक्षा जास्त पाणीसाठा
पुणे जिल्ह्याला पाणी पुरवठा करणाऱ्या धरण पाणलोट क्षेत्रात चांगला पाऊस झाल्यामुळे पुणेकरांची वर्षभराची पाण्याची चिंता आता मिटली आहे. पुणे जिल्ह्याला पाणी पुरवठा करणाऱ्या धरणात 90 टक्के पेक्षा जास्त पाणीसाठा आहे.
पुणे जिल्ह्यातील पानशेत, वरसगाव, टेमघर या तिन्ही धरणात सध्या पाणीसाठा 90 टक्क्यांपेक्षा जास्त आहे. खडकवासला धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू असल्याने या धरणामध्ये 75 टक्के पाणीसाठा आहे. मागच्या वर्षी याच काळात चार ही धरणात 79.66 टक्के इतका पाणीसाठा होता. यावर्षी याच काळात चारही धरणातील पाणासाठा हा मिळून 89.87 टक्के इतका आहे.
जुलै महिन्यामध्ये राज्यात मुसळधार पावसाने हजेरी लावली. पुणे जिल्ह्यासह घाटमाथ्यावर चांगला पाऊस झाला आहे. पुणे जिल्ह्याला पाणी पुरवठा करणाऱ्या धरण पाणलोट क्षेत्रामध्ये मोठा पाऊस होत आहे. त्यामुळे पुणेकरांना पाणी प्रश्न मिटला आहे. पुणे जिल्ह्याला पाणी पुरवठा करणाऱ्या धरणांत 90 टक्क्यांपेक्षा जास्त पाणीसाठा आहे.
आणखी वाचा :
भागवत कराड यांच्या ड्रीम प्रोजेक्ट जायकवाडी सौर प्रकल्पावर हरित लवाद्याचा ब्रेक?