- Home
- Maharashtra
- पुणेकरांनो सावध रहा! नववर्षाच्या जल्लोषासाठी पोलिसांची कडक नियमावली, नियम मोडल्यास थेट कारवाई
पुणेकरांनो सावध रहा! नववर्षाच्या जल्लोषासाठी पोलिसांची कडक नियमावली, नियम मोडल्यास थेट कारवाई
New Year Party Permissions Pune : नववर्षाच्या स्वागतासाठी पुणे पोलिसांनी कडक नियमावली लागू केली असून, कायदा-सुव्यवस्था राखण्यावर विशेष भर दिला आहे. हॉटेल्स आणि पबना रात्री दीड वाजेपर्यंत परवानगी असली तरी, नियम मोडणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाणार आहे.

नववर्षाच्या जल्लोषासाठी पोलिसांची कडक नियमावली
पुणे : नववर्षाच्या स्वागतासाठी अवघ्या काही दिवसांचा अवधी उरला असून, 31 डिसेंबरच्या रात्री शहरभर उत्साहाचे वातावरण असते. हॉटेल्स, पब, क्लब, फार्महाऊस तसेच खासगी कार्यक्रमांमध्ये जल्लोषात नववर्ष साजरे केले जाते. मात्र या उत्साहाला शिस्तीची चौकट घालण्यासाठी पुणे पोलिसांनी यंदा कडक नियमावली लागू केली आहे. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कोणतीही तडजोड न करता थेट कारवाई केली जाणार असल्याचा इशारा प्रशासनाने दिला आहे.
पोलिसांकडून विशेष खबरदारी घेतली जाणार
दरवर्षी नववर्षाच्या रात्री मद्यप्राशन करून वाहन चालवणे, सार्वजनिक ठिकाणी गोंधळ, किरकोळ वादातून हाणामारी किंवा कायदा-सुव्यवस्थेला धोका निर्माण करणाऱ्या घटना घडतात. या प्रकारांना आळा घालण्यासाठी यंदा पोलिसांकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे.
निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अधिक सतर्कता
महापालिका निवडणुकांचा कालावधी सुरू असल्याने यंदा परिस्थिती अधिक संवेदनशील आहे. त्यामुळे 31 डिसेंबरच्या जल्लोषादरम्यान कायदा आणि सुव्यवस्था अबाधित ठेवणे हे प्रशासनासमोर मोठे आव्हान आहे. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी शहरात अतिरिक्त पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात येणार असून, नियम मोडणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल, असे स्पष्ट करण्यात आले आहे.
हॉटेल्स-पबना रात्री दीड वाजेपर्यंत परवानगी
नववर्षाच्या स्वागतासाठी शहरातील परवानाधारक हॉटेल्स, पब आणि क्लबना रात्री दीड वाजेपर्यंत अटींसह सुरू ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे. मात्र क्षमतेपेक्षा जास्त गर्दी, नियमबाह्य मद्यविक्री किंवा इतर उल्लंघन आढळल्यास संबंधितांवर तात्काळ कारवाई करण्यात येणार आहे.
मद्यधुंद वाहनचालकांवर विशेष लक्ष
मद्यप्राशन करून वाहन चालवणाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी पोलिसांकडून ब्रेथ अॅनालायझरचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जाणार आहे. शहरातील विविध नाकाबंदी ठिकाणी वाहनांची कसून तपासणी होईल. मद्यधुंद अवस्थेत वाहन चालवताना कोणी आढळल्यास वाहन जप्ती, दंडात्मक कारवाई आणि गरज भासल्यास गुन्हा दाखल केला जाईल.
नववर्षाचा आनंद घेताना नियमांचे पालन करा
नववर्षाचा आनंद घेताना नियमांचे पालन करा, सुरक्षिततेला प्राधान्य द्या आणि कोणताही गैरप्रकार टाळा, असे आवाहन पोलिस प्रशासनाने पुणेकरांना केले आहे.

