दहावीत ३५% गुण मिळवूनही विशाल सलगर गावाचा हिरो ठरला आहे. शेतीकाम, गाईंची देखभाल आणि अभ्यास अशी तिहेरी जबाबदारी पेलत असतानाही त्याने दहावी परीक्षा उत्तीर्ण केली आहे. गावकऱ्यांनी त्याचा सत्कार केला आणि आता तो पुढील शिक्षणासाठी सज्ज झाला आहे.

पंढरपूर: परीक्षेत मेरिटवर नाही, पण मेहनतीवर पास झालेला आणि आज अख्ख्या गावाचा अभिमान ठरलेला एक विद्यार्थी विशाल सलगर! दहावीच्या परीक्षेत सगळ्या विषयांत केवळ ३५ टक्के गुण मिळवूनही तो ‘गावाचा हिरो’ ठरला आहे. मेहनत, चिकाटी, आणि कधीही हार न मानण्याची वृत्ती याचं उत्तम उदाहरण म्हणजे हा ‘पस्तीस टक्क्यांचा चॅम्पियन’.

Add Asianetnews Marathi as a Preferred SourcegooglePreferred

शेतकाम, गाईंची देखभाल आणि अभ्यास, तिन्ही समांतर!

भटुंबरे गावात राहणारा विशाल सलगर शेतीतील कामं, गाईंची देखभाल आणि अभ्यास अशी तिहेरी जबाबदारी पेलत होता. शाळेपासून घरी येताच तो शेतात आई-वडिलांना मदत करायचा. गुरांना चारापाणी, दूध काढणं आणि त्याचवेळी अभ्यास – हे सगळं त्याच्या दैनंदिन जीवनाचा भाग होतं.

दहावीचा निकाल काठावर पास, पण मनात झळाळी

आज जाहीर झालेल्या दहावीच्या निकालात विशालने सगळ्या विषयांत काठावर म्हणजे ३५ टक्के गुण मिळवून यश मिळवलं. ही केवळ पास होण्याची गोष्ट नाही, तर अपार मेहनतीचा विजय आहे. महत्त्वाचं म्हणजे तो हरला नाही, थांबला नाही!

गावकऱ्यांनी केला सन्मान, हार, पेढे, आणि अभिमान!

विशालचा निकाल ऐकून गावात जल्लोष झाला. ग्रामस्थांनी हार घालून, पेढे वाटून आणि ढोल-ताशांच्या गजरात त्याचा सत्कार केला. शेजाऱ्यांनी तर मिश्कीलपणे सांगितलं, “विशाल पास झाल्याच्या आनंदात त्याच्या गोठ्यातली कपिला गायसुद्धा आज बादलीभर दूध दिलं!"

“आता अजून शिकायचंय!”, विशालचा निर्धार

या यशानंतर विशाल म्हणतो, “मी फक्त पास झालो असलो तरी हे माझं पहिलं पाऊल आहे. आता जास्त मेहनत घेऊन चांगले मार्क मिळवायचे आहेत. त्याचा आत्मविश्वास पाहून शिक्षक, पालक आणि गावकरी सगळेच भारावून गेलेत. शिकायची जिद्द असली, की अडचणी केवळ थांबून पाहतात – विशालने हे सिद्ध केलं.

मार्क नाही, मेहनतीची किंमत!

या गोष्टीतून एक गोष्ट स्पष्ट होते यश फक्त मेरिट लिस्टमध्ये नाही, तर जिद्दीत असतं. आज पंढरीच्या मातीने एक मेहनती शिलेदार घडवला आहे. पस्तीस टक्क्यांतूनसुद्धा मोठं स्वप्न पाहणारा विशाल तो खराखुरा ‘पाथफाईंडर’ आहे!