- Home
- Maharashtra
- Pandarapur Kartik Ekadashi Special Trains: वारकऱ्यांसाठी आनंदवार्ता! कार्तिकी एकादशीसाठी पंढरपूरकडे धावणार विशेष रेल्वे, मध्य रेल्वेने जाहीर केलं वेळापत्रक
Pandarapur Kartik Ekadashi Special Trains: वारकऱ्यांसाठी आनंदवार्ता! कार्तिकी एकादशीसाठी पंढरपूरकडे धावणार विशेष रेल्वे, मध्य रेल्वेने जाहीर केलं वेळापत्रक
Pandarapur Kartik Ekadashi Special Trains: पंढरपूरच्या कार्तिकी एकादशीसाठी भाविकांची गर्दी लक्षात घेऊन मध्य रेल्वेने आदिलाबाद–पंढरपूर दरम्यान विशेष गाड्या चालवण्याचा निर्णय घेतला. या गाड्या ३१ ऑक्टोबर ते ५ नोव्हेंबर दरम्यान धावणार आहेत.

वारकऱ्यांसाठी आनंदाची बातमी
सोलापूर: पंढरपूरच्या कार्तिकी एकादशीसाठी हजारो भाविक दरवर्षी वारीला पायी आणि रेल्वेने येतात. यंदाही भाविकांच्या प्रचंड गर्दीचा अंदाज लक्षात घेऊन मध्य रेल्वेच्या सोलापूर विभागाने एक मोठा निर्णय घेतला आहे. भाविकांच्या सोयीसाठी आदिलाबाद–पंढरपूर दरम्यान विशेष गाड्या चालविण्याची घोषणा करण्यात आली आहे. मध्य रेल्वेने या विशेष गाड्यांचे वेळापत्रक 29 ऑक्टोबर रोजी जाहीर केले असून या गाड्या 31 ऑक्टोबरपासून 5 नोव्हेंबरपर्यंत धावतील.
आदिलाबाद–पंढरपूर विशेष रेल्वे
गाडी क्रमांक 07613, आदिलाबाद ते पंढरपूर
ही विशेष गाडी 31 ऑक्टोबर ते 4 नोव्हेंबर दरम्यान दररोज सकाळी 8:30 वाजता आदिलाबादहून सुटेल आणि दुसऱ्या दिवशी रात्री 2:00 वाजता पंढरपूरला पोहोचेल. या गाडीच्या एकूण 2 फेऱ्या असतील.
गाडी क्रमांक 07614, पंढरपूर ते आदिलाबाद
ही गाडी 1 नोव्हेंबर ते 5 नोव्हेंबर दरम्यान दररोज रात्री 8:00 वाजता पंढरपूरहून सुटेल आणि दुसऱ्या दिवशी दुपारी 12:15 वाजता आदिलाबादला पोहोचेल. या दिशेनेही 2 फेऱ्या होणार आहेत.
थांबे
या विशेष रेल्वेला खालील महत्त्वाच्या स्थानकांवर थांबे असतील. किनवट, बोधडी बुजुर्ग, धानोरा डेक्कन, सहस्त्रकुंड, हिमायतनगर, भोकर, मुदखेड, नांदेड, पूर्णा, परभणी, गंगाखेड, परळी वैजनाथ, पानगाव, लातूर रोड, लातूर, हरंगुळ, औसा रोड, ढोकी, येडशी, धाराशिव, पांगरी, बार्शी टाऊन, शेंद्री, कुर्डूवाडी आणि मोडलिंब. रेल्वे प्रशासनाने भाविकांना वैध तिकीटासह प्रवास करण्याचे आणि गर्दीच्या वेळी शिस्त राखण्याचे आवाहन केले आहे.
विशेष रेल्वेचा उद्देश
दरवर्षी लाखो वारकरी कार्तिकी एकादशीला पंढरपूरला दाखल होतात. त्यामुळे या विशेष गाड्या चालवल्याने भाविकांना मोठा दिलासा मिळणार आहे. मध्य रेल्वेने या गाड्यांचे नियोजन अगोदरच केल्याने या वेळेस वारीचा प्रवास अधिक सुरळीत होणार आहे.

