Wife Killed Husband In Airoli : नवी मुंबईतील ऐरोलीत पत्नीने प्रियकराच्या मदतीने तिच्या पतीची हत्या केली. ही घटना ११ महिने लपवण्यात आली. मात्र एका घटनेने पोलिसांनी आरोपीला पडकून गुन्ह्याचा उलगडा केला.
नवी मुंबई : नवी मुंबईतील ऐरोली येथील एका भयंकर हत्याकांडचा उलगडा झाला आहे. ११ महिन्यांपूर्वी पत्नीने तिच्या प्रियकराच्या मदतीने पतीची हत्या केली होती. या घटनेचा पोलिसांनी तपास करत आरोपी पत्नी आणि तिच्या प्रियकराला अटक केली आहे. न्यायालयाने दोघांना सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. अनैतिक संबंधात अडथळा ठरत असल्याने पत्नीने पतीला संपवलं. पतीच्या मृतदेहाचे तीन तुकडे करुन ते जंगलात फेकल्याचं पोलीस तपासात समोर आलं आहे.

नेमकं काय घडलं?
ऐरोली इथे एका विवाहित महिलेचं रिक्षाचालकावर प्रेम होतं. मात्र आपला पती प्रेमाआड असल्याने तिने पतीला संपवण्याचं ठरवलं. पत्नी सुनिता कुशवाह आणि तिचा रिक्षाचालक प्रियकर राहुल प्रजापती या दोघांनी पतीला संपवलं. त्यानंतर पुरावे सापडू नये म्हणून मृतदेहाचे तीन तुकडे केले. ते तुकडे गवळी देव डोंगर परिसरातील जंगलात फेकले. मृतदेहाचे तुकडे त्यांनी एकाच ठिकाणी न टाकता वेगवेगळ्या ठिकाणी फेकले.
हे हत्याकांड महिला आणि तिच्या प्रियकराला तब्बल ११ महिने लपवता आलं. मात्र मृत व्यक्तीच्या भावाला संशय आल्याने त्याने पोलिसांत तक्रार दाखल केली. त्यानंतर पोलिसांनी तपास सुरू केला. पोलिसांनी कॉल रेकॉर्ड, तांत्रिक तपासांतून पोलिसांनी आरोपीला शोधलं. आरोपींची कसून चौकशी करण्यात आली. पोलिसांना चौकशीत विसंगती आढळली. त्यातूनच हत्याकांडचा उलगडा झाला.
तब्बल ११ महिन्यांनी पोलिसांनी हत्याकांड उघड केलं. आरोपींनी हत्या केल्याचं कबूल केलं. आरोपींनी गुन्हा कबूल केल्यानंतर पोलिसांनी जंगलात टाकलेले मृतदेहाचे तुकडे शोधण्यास सुरुवात केली आहे. दरम्यान, पोलिसांनी आरोपींना कोर्टात दाखल केलं. कोर्टाने मृताची पत्नी सुनिता कुशवाह आणि तिचा प्रियकर राहुल प्रजापती यांना अटक केली आहे. कोर्टाने दोन्ही आरोपींना पोलीस कोठडी सुनावली आहे.


