Nashik TCS Case : नाशिकमधील TCS युनिटमध्ये उघडकीस आलेल्या लैंगिक शोषण आणि धर्मांतराच्या आरोपांनंतर कंपनीने तात्पुरते कामकाज स्थगित केले आहे. सहा आरोपींना अटक झाली असून HR निदा खान फरार आहे. प्रकरणाची पोलिस, कंपनी आणि विविध यंत्रणांकडून सखोल चौकशी सुरू आहे.

Nashik TCS Case : नाशिकमधील आयटी क्षेत्राला हादरा देणाऱ्या लैंगिक शोषण प्रकरणाने राज्यभरात खळबळ उडवली आहे. या प्रकरणात पोलिसांनी आतापर्यंत सहा आरोपींना अटक केली असली, तरी कंपनीची HR प्रमुख निदा खान अद्याप फरार असून तिचा शोध सुरू आहे. गंभीर आरोपांच्या पार्श्वभूमीवर Tata Consultancy Services (TCS) ने आपल्या नाशिक युनिटमधील कामकाज तात्पुरते थांबवण्याचा निर्णय घेतला आहे.

कामकाज ठप्प, कर्मचाऱ्यांना WFH निर्देश

मिळालेल्या माहितीनुसार, कंपनीने सुमारे 150 कर्मचाऱ्यांना पुढील आदेशापर्यंत Work From Home करण्यास सांगितले आहे. कार्यालयात उपस्थित राहू नये, असे स्पष्ट निर्देश देण्यात आले आहेत. या निर्णयामुळे कंपनीच्या दैनंदिन कामकाजावर तात्पुरता परिणाम झाला आहे.

वरिष्ठ अधिकाऱ्यांची झाडाझडती, दिल्ली टीमची चौकशी

बुधवारी कंपनीत वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून सखोल झाडाझडती घेण्यात आली. दिल्लीहून आलेल्या विशेष टीमने कंपनीतील कथित गैरप्रकारांची चौकशी केली असून, कर्मचाऱ्यांचे जबाब नोंदवताना काही गंभीर तक्रारी समोर आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

धर्मांतर आणि लैंगिक अत्याचाराचे आरोप

या प्रकरणात केवळ लैंगिक शोषणच नव्हे, तर कर्मचाऱ्यांवर धर्मांतरासाठी दबाव टाकल्याचेही आरोप आहेत. कंपनीने या सर्व बाबींची अंतर्गत विभागीय चौकशी सुरू केली आहे. या चौकशीमुळे आणखी धक्कादायक माहिती समोर येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

शासकीय यंत्रणांची धडक कारवाई

कामगार उपायुक्त कार्यालयानेही कंपनीत तपासासाठी धाड टाकली. मात्र, त्यावेळी कंपनीत एकही कर्मचारी उपस्थित नसल्याचे आढळले. अधिकाऱ्यांनी शॉप अ‍ॅक्टसह इतर कागदपत्रांची तपासणी केली आहे.

राष्ट्रीय महिला आयोगाची एंट्री

या प्रकरणाची गंभीर दखल घेत राष्ट्रीय महिला आयोगाची टीम 18 एप्रिल रोजी नाशिकमध्ये भेट देणार आहे. या पाहणीनंतर प्रकरणात महत्त्वाचे खुलासे होण्याची शक्यता आहे.

भरती प्रक्रिया स्थगित

सद्यस्थितीत TCS ने नाशिक युनिटमधील नवीन भरती प्रक्रिया देखील थांबवली आहे. पोलिस तपास पूर्ण होईपर्यंत भरती प्रक्रिया स्थगित ठेवण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.