गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर नागपुरात 3 सप्टेंबरपासून 1 नोव्हेंबरपर्यंत डीजे, डीजेची वाहने, डिम लाईट आणि लेझर लाईटवर बंदी घालण्यात आली आहे. पोलिस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी हा आदेश जारी केला आहे.
मुंबई : राज्यभर गणेशोत्सवाची धूम सुरू असतानाच नागपुरात डीजे आणि ध्वनिवर्धकांबाबत मोठा निर्णय घेण्यात आला आहे. नागपूरचे पोलिस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी 3 सप्टेंबरपासून 1 नोव्हेंबरपर्यंत डीजे, डीजेची वाहने, डिम लाईट आणि लेझर लाईटवर बंदी घातली आहे. या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचा इशाराही पोलिस प्रशासनाने दिला आहे.
मिरवणुकांमध्ये डॉल्बी साउंड सिस्टमवर निर्बंध
गणेशोत्सव आणि आगामी सणांच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे. आदेशानुसार, मिरवणुकीदरम्यान डीजे आणि डॉल्बी साउंड सिस्टमचा वापर करण्यावर निर्बंध राहणार आहेत. त्याचबरोबर डीजेची वाहने, डिम लाईट आणि लेझर लाईटचाही वापर करता येणार नाही. ध्वनी प्रदूषण आणि नागरिकांना होणारा त्रास लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर पोलिसांकडून कारवाई केली जाणार आहे.
पुण्यातही डीजे, डॉल्बीवर बंदीची मागणी
दरम्यान, पुण्यातही गणेशोत्सवाच्या काळातील ध्वनी प्रदूषणाचा मुद्दा चर्चेत आला आहे. सामान्य नागरिक विद्यानंद बापट यांनी पुण्यात डीजे, डॉल्बी आणि ढोल-ताशांवर बंदी घालण्याची मागणी केली आहे. पुणे महापालिकेच्या बैठकीत त्यांनी ही मागणी मांडली.
गणेशोत्सवाच्या मिरवणुकांमुळे मोठ्या प्रमाणात ध्वनी प्रदूषण होते आणि त्याचा नागरिकांना त्रास सहन करावा लागतो, असा दावा बापट यांनी केला आहे. त्यांनी गणेशोत्सवाच्या मिरवणुकांवरही बंदी घालण्याची मागणी केली आहे.
गणेश मंडळांची भूमिका
नागपुरात डीजे आणि संबंधित उपकरणांवर बंदी घालण्यात आल्यानंतर गणेश मंडळांकडून यावर काय प्रतिक्रिया येते, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. तसेच पुण्यातील डीजे आणि डॉल्बीबंदीच्या मागणीवर गणेश मंडळे आणि प्रशासनाची भूमिका काय असेल, याकडेही नागरिकांचे लक्ष लागले आहे.


