मुंबईत बेस्ट बस कर्मचाऱ्यांनी मागील तीन दिवसांपासून पुकारलेला संप अखेर मागे घेण्यात आला आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत झालेल्या बैठकीनंतर बेस्टने संप मागे घेतला. उपमुख्यमंत्र्यांनी बेस्ट कर्मचाऱ्यांच्या मागण्यांबाबत महत्त्वाचे निर्देश दिल्यानंतर हा बेस्ट बस कर्मचाऱ्यांनीो हा संप मागे घेतला आहे. 

मुंबई : बेस्टच्या कर्मचाऱ्यांनी मागील तीन दिवसांपासून संप केला होता. आता विविध मागण्यांसाठी करण्यात आलेला हा संप रविवारी रात्री मागे घेण्यात आला आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बेस्ट कर्मचाऱ्यांच्या मागण्यांसाठीचे निर्देश दिल्यानंतर बेस्ट कामगार संयुक्त कृती समितीने हा संप मागे घेत असल्याची घोषणा रविवारी रात्री केली.

Add Asianetnews Marathi as a Preferred SourcegooglePreferred

बेस्टच्या १२ संघटनांनी गुरुवारी रात्रीपासून कामबंद संप पुकारला होता. संपानंतर रविवारी सह्याद्री अतिथीगृह इथे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्यासोबत बेस्ट कामगार संयुक्त कृती समिती बैठक पार पडली. तासभर झालेल्या या बैठकीत कर्मचाऱ्यांच्या मागण्यांबाबत उपमुख्यमंत्र्यांनी केलेल्या घोषणेनंतर गुरुवारपासून, अर्थात मागील तीन दिवसांपासून सुरू असलेला संप मागे घेण्यात आला.

काय होत्या मागण्या?

कायमस्वरुपी कर्मचाऱ्यांची ३ हजार रुपये, तर कंत्राटी कर्मचाऱ्यांना २ हजार रुपये मासिक हंगामी वाढ देण्याची बेस्ट कर्मचाऱ्यांची मागणी होती. तसंच निवृत्त कर्मचाऱयांची थकीत देणी, प्रलंबित ग्रॅच्युईटीची रक्कम याच वर्षात देण्याचीही मागणी होती. या मागण्यांची उपमुख्यमंत्र्यांनी बैठकीत घोषणा केल्यानंतर बेस्टकडून संप मागे घेण्यात आला आहे. शिवाय इतर विषयांवर येत्या १५ दिवसांत चर्चाही करणार असल्याचं सांगण्यात आलं आहे. एकनाथ शिंदे यांच्या निर्णयानंतर संप मागे घेण्यात आल्याने मुंबईकरांना मोठा दिलासा मिळाला आहे.

बेस्ट कर्मचाऱ्यांनी चांगले कँटिन, चांगले वॉशरुम देण्यात येतील, असंही उपमुख्यमंत्र्यांनी सांगितलं. बेस्टच्या ताफ्यात पुढील तीन वर्षात तब्बल पाच हजार इलेक्ट्रिक बस येणार असल्याची माहितीही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बेस्ट बसच्या कृती समितीच्या बैठकीत दिली. बेस्टच्या स्वमालकीच्या बसची संख्या कमी असल्याने तोटा वाढतो आहे, मात्र पुढील पाच वर्षात बेस्ट बस आर्थिकदृष्ट्या सक्षम केली जाईल, बेस्टचा महसूल वाढवण्याचा प्रयत्न करणार असल्याचंही उपमुख्यमंत्र्यांनी या बैठकीत सांगितलं.