Monsoon 2026 : Skymet च्या अंदाजानुसार, ‘एल निनो’च्या प्रभावामुळे 2026 मध्ये भारतात मान्सून सरासरीपेक्षा कमी राहू शकतो. जूनमध्ये पाऊस स्थिर राहण्याची शक्यता असली, तरी जुलै ते सप्टेंबरमध्ये घट अपेक्षित आहे. याचा परिणाम शेती आणि जलस्रोतांवर होऊ शकतो.

Monsoon 2026 : देशातील मान्सून 2026 संदर्भात चिंताजनक अंदाज समोर आला आहे. Skymet या खासगी हवामान संस्थेने दिलेल्या माहितीनुसार, यंदा ‘एल निनो’च्या प्रभावामुळे देशात सरासरीपेक्षा कमी पाऊस पडण्याची शक्यता आहे. जून ते सप्टेंबर या कालावधीत एकूण पर्जन्यमान हे सरासरीच्या केवळ 94 टक्के राहण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

Add Asianetnews Marathi as a Preferred SourcegooglePreferred

किती पावसाचा अंदाज?

Skymet च्या अंदाजानुसार, यंदा मान्सून हंगामात देशभरात सरासरीपेक्षा कमी पाऊस पडू शकतो. जून महिन्यात मान्सून तुलनेने स्थिर राहण्याची शक्यता असली, तरी जुलै ते सप्टेंबर या कालावधीत पावसाची तीव्रता कमी होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. विशेषतः मध्य आणि उत्तर-पश्चिम भारतात पावसाची कमतरता जाणवू शकते, ज्याचा परिणाम शेती आणि जलस्रोतांवर होण्याची भीती आहे.

मान्सूनचे वेळापत्रक काय सांगते?

साधारणपणे, दक्षिण-पश्चिम मान्सून १ जून रोजी केरळमध्ये दाखल होतो आणि १५ जुलैपर्यंत संपूर्ण देश व्यापतो. मात्र, यंदाच्या परिस्थितीत मान्सूनची गती आणि तीव्रता दोन्हीवर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. दरम्यान, India Meteorological Department (IMD) कडूनही पुढील आठवड्यात अधिकृत अंदाज जाहीर होण्याची शक्यता आहे.

-‘एल निनो’ आणि ‘ला निना’ म्हणजे काय?

‘एल निनो’ (El Niño) ही अशी हवामान स्थिती आहे, ज्यामध्ये पॅसिफिक महासागराच्या पृष्ठभागाचे तापमान सरासरीपेक्षा जास्त वाढते. यामुळे भारतीय मान्सूनवर नकारात्मक परिणाम होऊन पाऊस कमी होतो. तर ‘ला निना’ (La Niña) ही याच्या उलट स्थिती असून, महासागराचे तापमान कमी झाल्यास मान्सूनला बळकटी मिळते आणि पाऊस चांगला होतो.

दुसऱ्या सहामाहीत वाढणार ‘एल निनो’चा प्रभाव

हंगामाच्या दुसऱ्या सहामाहीत ‘एल निनो’ची तीव्रता वाढण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे जुलै ते सप्टेंबर दरम्यान पावसात अधिक घट होऊ शकते. यामुळे शेती, पाणीपुरवठा आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेवर मोठा परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.