सार
Monsoon Update 2024:मध्य महाराष्ट्रासह उत्तर महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाडा आणि कोकणातील जिल्ह्यांना वादळी वाऱ्यासह ‘यलो अलर्ट’चा इशारा देण्यात आला आहे.
Monsoon Update 2024 राज्यात मान्सून दाखल झाला असून तो रत्नागिरी आणि सोलापूर भागात स्थिर आहे. त्याची पुढील वाटचाल शनिवारपासून ८ जुन होईल असा अंदाज आहे. दरम्यान पुढील पाच दिवस राज्यात विजांच्या कडकडाटासह आणि ढगांच्या गडगडाटासह जोरदार पाऊस होईल, असा अंदाज भारतीय हवामानशास्त्र विभागाने दिला आहे. मध्य महाराष्ट्रासह उत्तर महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाडा आणि कोकणातील जिल्ह्यांना वादळी वाऱ्यासह ‘यलो अलर्ट’चा इशारा देण्यात आला आहे.
राज्यामध्ये गेल्या तीन-चार दिवसांपासून वादळी वाऱ्यासह पाऊस होत आहे. यंदा कमी वेळेमध्ये अधिक पाऊस असा पॅटर्न राहील, असा इशारा हवामान विभागाने दिला होता. अगदी तसाच पॅटर्न सध्या पाहायला मिळत आहे. पुण्यामध्ये त्याचा फटका बसला आहे. कात्रज, लोहगाव आणि वडगावशेरीला ढगफुटीसारखा पाऊस पाहायला मिळाला.
सध्या मान्सून आल्याने राज्यात ढगाळ वातावरण तयार झाले आहे. कोकण, मध्य महाराष्ट्राच्या दक्षिण भागात मान्सूनच्या सरींनी गारवाही तयार केला आहे. रत्नागिरी, सोलापूर, कोल्हापूर हा दक्षिण भाग सोडला, तर राज्यातील उर्वरित भागात पूर्वमोसमी पाऊस होत आहे. दरम्यान, सध्या उत्तर गुजरातमध्ये चक्राकार वाऱ्याची स्थिती असून मध्य प्रदेशपासून पश्चिम बंगालपर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे.
आणखी वाचा :